सव्वा तीन वर्षापूर्वी झालेल्या खुनाचा इचलकरंजी पोलिसांनी लावला छडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

इचलकरंजी - येथील निलेश उर्फ गोपी दगडू धुमाळ (वय 23, रा.विरशैव बँकेमागे, गोंधळी गल्ली) याचा सव्वा तीन वर्षापूर्वी गळा आवळून खून झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शिरदवाड स्मशानभूमीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी मुख्य सूत्रधार ऋषीकेश पवनकुमार घोरपडे (रा. आर.पी.रोड) याच्यासह पाचजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी चौघांना अटक झाली आहे. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नामुळे या खूनाला वाचा फुटली. 

इचलकरंजी - येथील निलेश उर्फ गोपी दगडू धुमाळ (वय 23, रा.विरशैव बँकेमागे, गोंधळी गल्ली) याचा सव्वा तीन वर्षापूर्वी गळा आवळून खून झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह शिरदवाड स्मशानभूमीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी मुख्य सूत्रधार ऋषीकेश पवनकुमार घोरपडे (रा. आर.पी.रोड) याच्यासह पाचजणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. यापैकी चौघांना अटक झाली आहे. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नामुळे या खूनाला वाचा फुटली. 

मुख्य सुत्रधार घोरपडे हा मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा जिल्हाध्यक्ष होता. त्याच्या कार्यालयातच निलेशचा खून झाला. त्याला चारच दिवसांपूर्वी मोटार चोरी प्रकरणी शहापूर पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पूर्वीपासूनच त्याच्यावर संशय होता. चोरी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्यावर तपास केंद्रीत करण्यात आला. त्यानंतर धक्कादायक माहिती पुढे आली. आपल्या भानगडींची माहिती पोलीसांना देत असल्याच्या संशयातून निलेशचा गेम करण्यात आल्याची कबुली घोरपडे याने दिली आहे.

या प्रकरणी रुपेश उर्फ पप्पू मारुती नाईक (वय 32, रा. नेहरुनगर), ओंकार राजेंद्र पुजारी (25, पटेकर गल्ली, गावभाग), मनीष मोहन कांदेकर (23, सिल्वर झोन, हुपरी) व मुकूंद बाबुराव धुमाळ (22, बंडगर माळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना तीन ऑगष्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या बाबतची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकारांना दिली.

भांडी दुकान चालविणार्‍या निलेश हा 3 मार्च 2016 रोजी अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर सुरुवातील नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यानच्या काळात घोरपडे यांने निलेशचा भाऊ संतोष याला निलेशचे अपहरण केले असून खंडणीची मागणी केल्याचे सांगितले. त्यानुसार नातेवाईकांकडून आठ लाखाची घोरपडे यांने खंडणी उखळली. प्रत्यक्षात मात्र निलेश याचा ठावठिकाणा लागत नव्हता. घोरपडे हाच त्याच्या मोबाईलव्दारे वेगवेगळ्या ठिकाणांहून नातेवाईकांशी संपर्क साधून दिशाभूल करीत होता.

अखेर 18 जुलै 2016 रोजी संतोष यांनी शिवाजीनगर पोलिसांत घोरपडे याच्या विरोधात निलेशचे अपहरण करुन खंडणी उखळल्याबद्दल तक्रार दिली. पोलिसांनी घोरपडे याला अटक करुन त्याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र निलेश सापडला नाही. दरम्यान, इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखेकडील कर्मचारी महेश कोरे व विजय तळसकर यांना घोरपडे व त्याच्या साथीदारांनी निलेशचा खून केल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. त्यानुसार दोन पथके तयार करुन वेगवेगळ्या शहरातून चौघांना अटक केली. यातील कांहीजण तांत्रिक शिक्षण घेत आहेत. 

खंडणीच्या उद्देशाने व निलेश हा पोलीसांना आपली माहिती देत असल्याच्या कारणातून त्याचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे घोरपडे यांने कबूल केल्याचे श्री.घाडगे यानी सांगितले. यावेळी पोलीस उप अधिक्षक गणेश बिरादार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विकास जाधव, उपनिरिक्षक रणजीत तिप्पे, अमोल माळी यांच्यासह कर्मचार्‍यांचे पथक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ichalkaraji police investigate murder case