फासेपारधी समाजाची दप्तरी नोंदीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

इचलकरंजी - इचलकरंजी नगरपालिकेकडे फासेपारधी समाजाबाबत कोठेच नोंद नसल्याने हा समाज शासकीय योजनांपासून आजतागायत वंचितच राहिला आहे. या समाजाची नगरपरिषद दप्तरी नोंद करुन घ्यावी, यासह विविध मागण्यांबाबतचे निवेदन मंगळवारी आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दिले.

अनेक वर्षांपासून इचलकरंजीत फासेपारधी समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहेत; मात्र या समाजाची शासनदप्तरी कोठेच नोंद नसल्याने हा समाज विकासापासून दूरच आहे. नगरपरिषदेने या समाजाची नोंद घ्यावी. त्याचबरोबर आवश्‍यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात यासाठी संस्थेतर्फे सातत्याने आंदोलन केले जात आहे. त्याअंतर्गत मंगळवारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे व आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी रसाळ यांची भेट घेतली. काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, नगरसेवक शशांक बावचकर उपस्थित होते.

मुख्याधिकारी रसाळ यांनी लवकरच शहरातील सर्वच फासेपारधी समाजाचे सर्वेक्षण करून नगरपरिषद दप्तरी त्याची नोंद करण्याचे आश्‍वासन दिले. गट नं. ११७ ही जागा आरक्षित असल्याने त्याठिकाणी पुनर्वसन न करता अन्य शासकीय योजनेतून ११ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येईल. तसेच सांस्कृतिक भवन, ग्रंथालयासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे नव्याने प्रस्ताव तयार करुन तो पाठविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी मल्लू चव्हाण, गणपती काळे, शंकर चव्हाण, अजित मिणेकर, नौशाद जावळे, राजू बोंद्रे उपस्थित होते.

Web Title: ichalkaranji news demand register for phaseparadhi samaj