इचलकरंजीत टेक्‍स्टाईलला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

इचलकरंजी - येथील गंगानगरमधील साई टेक्‍स्टाईल कारखान्याला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. आगीत 12 लूम मशिनसह एक हजार कापडाचे तागे, पाच टन सूत जळून सुमारे 90 लाखांचे नुकसान झाले. पंचगंगा कारखाना व इचलकरंजी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत तब्बल पाच तासांच्या कालावधीनंतर आग आटोक्‍यात आणली. 

येथील उद्योजक अमित आनंदा इंगळे यांनी स्टेशन रोडवरील गंगानगर परिसरात पाच वर्षांपूर्वी साई टेक्‍स्टाईल कारखाना उभारला आहे. त्यांनी कारखान्यामध्ये अत्याधुनिक लूम बसविले आहेत. कारखान्यास पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागल्याचे शेजारील रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती उद्योजक श्री. इंगळे यांच्यासह पंचगंगा साखर कारखान्याच्या अग्निशामक दलासह नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. या दोन्ही अग्निशामक दलाचे पाण्याचे बंब घटनास्थळी आले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून कारखान्याला घेरले. अग्निशामक दलाच्या जवानांनी नागरिकांच्या मदतीने आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल दहाहून अधिक पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने पाच तासांनंतर आग आटोक्‍यात आणण्यास यश मिळविले; पण संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडून कारखान्यातील 12 लूम मशिनसह एक हजार कापडाचे तागे, पाच टन सूत असे सुमारे 90 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. 

अनर्थ टळला 
साई टेक्‍स्टाईल कारखान्याशेजारी ऑईलची चार बॅरेल ठेवली होती. ही बॅरेल नागरिकांनी त्वरित हलविले. त्यामुळे अनर्थ टळला. 

Web Title: ichalkaranji news fire