'काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान'ला इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

इचलकरंजी - येथील आपटे वाचन मंदिरातर्फे देण्यात येणारा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार नगर येथील कवी गणेश शिवाजी मरकड यांच्या "काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचा उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार भानू काळे यांच्या "अंगारवाटा...शोध शरद जोशींचा' या साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. ग्रंथालयाचे अध्यक्ष ऍड. स्वानंद कुलकर्णी आणि इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विलास शहा यांनी 2016 या वर्षासाठीच्या ग्रंथ पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली.

या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये "सकाळ प्रकाशना'च्या दोन पुस्तकांचा समावेश आहे. माजी लष्करप्रमुख जन. व्ही. पी. मलिक यांच्या "इंडियाज्‌ मिलिटरी कॉन्फ्लिक्‍टस्‌ ऍन्ड डिप्लोमसी ः ऍन इनसाइड व्ह्यू ऑफ डिसिजन मेकिंग' या पुस्तकाच्या पुणे सकाळचे वृत्तसंपादक माधव गोखले यांनी केलेल्या "भारताचे लष्करी संघर्ष आणि राजनय- निर्णय प्रक्रियेचे अंतरंग' या अनुवादाला उत्कृष्ट अनुवादित साहित्यकृतीसाठीचा महादेव बाळकृष्ण जाधव पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृतीसाठीच्या दोन पुरस्कारांमध्ये ऐश्‍वर्य पाटेकर यांच्या "सकाळ प्रकाशना'ने प्रसिद्ध केलेल्या "जू' या आत्मकथनाचा समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या "मन में है विश्‍वास' या आत्मकथनालाही विशेष लक्षणीय गद्य साहित्यकृतीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अन्य पुरस्कारांमध्ये सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह "न रडणारी मुलगी' -सुप्रिया अय्यर (नागपूर), वि. मा. शेळके गुरुजी उत्कृष्ट कादंबरी "बगळा' - प्रसाद कुमठेकर (वसई), फाटक बंधू स्मरणार्थ लक्षणीय काव्यसंग्रह "शहर आत्महत्या करायचं म्हणतंय...!' -

सुशीलकुमार शिंदे (ठाणे), विशेष लक्षणीय काव्यसंग्रह "पाथेय' -ल. सि. जाधव (सोलापूर), शामराव भिडे उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती "आठवणींतील दवबिंदू' - कर्नल अरविंद वसंत जोगळेकर (पुणे), पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती "मनात आहे पुष्कळ पुष्कळ' - उत्तम कोळगावकर (नाशिक) यांचा समावेश आहे.

ए. के. राजापुरे यांना स्थानिक साहित्यिक गौरव पुरस्काराने तर प्रा. मोहन दत्तात्रय पुजारी यांना उत्कृष्ट वाचक पुरस्काराने गौरवण्यात येईल.

पुरस्कारांचे वितरण येत्या गुरुवारी (ता. 13), इंदिरा संत यांच्या स्मृतिदिनी, 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: ichalkaranji news indira sant Excellent poetry collection award