धनगर समाजाने मते दिली असती तर केंद्रात मंत्री असतो: जानकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

रासपमध्ये तालुका, जिल्हाध्यक्षांची बोंबाबोंब! 
पक्ष चालवताना फार अडचणी येतात. आमच्याच राष्ट्रीय समाज पक्षाला पंढरपूर तालुकाध्यक्ष मिळाला नाही. मिळाला तर कधी फुटून दुसऱ्या पक्षात जाईल याचा नेम नाही. जिल्हाध्यक्षाची तर बोंबाबोंब आहे, असे ही मंत्री जानकर यांनी आपल्याच पक्षाच्या वाढीबद्दल मत व्यक्त केले.

पंढरपूर - बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाने मला कमी मतदान दिले; मात्र ब्राह्मण व मराठा समाजाने जास्त मतदान दिले. जर धनगर समाजाने भरघोस मतदान दिले असते, तर राज्याऐवजी मी केंद्रात मंत्री झालो असतो, असे विधान आपल्याच समाजाबद्दल राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी पंढरपुरात केले. 

मंत्री जानकर श्री विठ्ठल दर्शनासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जानकर म्हणाले, की बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या गावांमध्ये धनगर समाज संख्येने जास्त आहे, त्या गावांमध्ये मला मतदान कमी झाले, तर याउलट ब्राह्मण आणि मराठा समाजाची जास्त संख्येने मते मिळाली. जर मला धनगर समाजाने आपला माणूस म्हणून मते दिली असती, तर मी राज्याऐवजी केंद्रात मंत्री झालो असतो. मी काही धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्री झालो नाही. 

धनगर आरक्षणाबाबत आपली भूमिका मवाळ झाली आहे का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, की धनगर व मराठा समाजालादेखील आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. मी धनगर समाजाचा नेता नाही. पक्ष चालवताना सर्व समाजाला बरोबर घेऊन चालावे लागते. फक्त जातीवर पक्ष चालत नसतो. राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार म्हणून मराठा समाजाचे बाळासाहेब पाटील निवडून आले. पक्ष चालवणे आता सोपे राहिले नाही. 

शिवसेना-भाजप युतीमध्ये सध्या सुरू असलेल्या धूसफुसीबद्दल विचारले असते जानकर म्हणाले, की राज्यातील युतीचे सरकार टिकावे, यासाठी मी स्वतः उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही पाय धरण्यास तयार आहे. खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात समेट घडवण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच बैठक घेतली. खासदार राजू शेट्टींच्या कोल्हापूर येथील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठीदेखील मीच मंत्री सदाभाऊ खोत यांना जाण्यास सांगितले. शासन तुमच्यामध्ये भांडण लावणार, त्यावर किती भांडायचे हे तुम्हीच ठरवा, असा सल्लाही जानकारांनी शेट्टी-खोत यांना दिला. 

रासपमध्ये तालुका, जिल्हाध्यक्षांची बोंबाबोंब! 
पक्ष चालवताना फार अडचणी येतात. आमच्याच राष्ट्रीय समाज पक्षाला पंढरपूर तालुकाध्यक्ष मिळाला नाही. मिळाला तर कधी फुटून दुसऱ्या पक्षात जाईल याचा नेम नाही. जिल्हाध्यक्षाची तर बोंबाबोंब आहे, असे ही मंत्री जानकर यांनी आपल्याच पक्षाच्या वाढीबद्दल मत व्यक्त केले.

Web Title: if dhangar community had voted then there would be minister in the centre mahadev jankar