तिथे डॉक्‍टर असते तर तो वाचला असता... "या' आरोग्य केंद्राची चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अक्षय कदम याचा मृत्यू झाला. अशी तक्रार अक्षयच्या नातेवाइकांनी प्रांताधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाली आहे.

कडेगाव-सांगली : हिंगणगाव बुद्रुक (ता.कडेगाव) येथ नागदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने पंधरा वर्षीय अक्षय दादासो कदम या शाळकरी मुलाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दोन सदस्यांची चौकशी समिती नेमली आहे.या समितीने आज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सविस्तर चौकशी केली. 

सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने अक्षय कदम याचा मृत्यू झाला. अशी तक्रार अक्षयच्या नातेवाइकांनी प्रांताधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाली आहे. 
अक्षयला मंगळवारी (ता.18) पहाटे अडीचच्या सुमारास झोपेतच डाव्या हाताला मनगटाजवळ नागाने दंश केला होता. नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. डॉक्‍टर मुख्यालयी नव्हते. तेथे उपचार झाले नाहीत. नंतर कडेगावला हलवले. कडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी त्यांना हिंगणगाव बुद्रुक येथे रुग्णवाहिका मिळाली नाही. ग्रामीण रुग्णालयात इंजेक्‍शन देऊन जुजबी उपचार करण्यात आले. 

पुढील उपचारासाठी कराडला नेण्यासाठीदेखील ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यानंतर खाजगी वाहन मिळवण्यात बराच वेळ गेला. अखेर खासगी वाहनांने कराड येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तत्पूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला होता. वेळेत उपचार होऊ शकले नाहीत त्यामुळे अक्षयचा मृत्यू झाला. नागदंश झालेल्या अक्षयचा जीव वाचवण्याची मोठा भाऊ व चुलत्यांची चार तासांची सुरु असलेली धडपड आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे अपयशी ठरली. अक्षयचा उपचाराअभावी रूग्णालयाच्या वाटेतच मृत्यू झाला. 

अक्षयच्या मृत्यूची चौकशी करावी याबाबत राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सूचना केल्या होत्या. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनीही उपचारात दिरंगाई झाल्याबद्दल कारवाईचे आदेश दिले आहेत. 
त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी अक्षयच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पाटील व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी यांची नेमणुक केली आहे. 

आज दिवसभर समितीने हिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन अक्षयचा मृत्यू व उपचाराबद्दल झालेल्या दिरंगाईची चौकशी केली. त्यांनी सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी चर्चा केली. ते जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाला चौकशी अहवाल सादर करणार आहेत. 

कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती आशिष घार्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती होलमुखे, महेश कदम यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

दरम्यान, अक्षयच्या नागदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे माजी जि. प. अध्यक्ष संग्रामसिह देशमुख यांनी यावेळी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: if doctor available that time, he will be alive, but