सरकारमध्ये हिंमत असेल तर, पोलीस संरक्षणात दूध नेऊन दाखवावे - तुपकर

सुदर्शन हांडे
शनिवार, 14 जुलै 2018

बार्शी (सोलापूर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जमा करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 16 जुलै पासून दूध बंद आंदोलन सुरू करत असून या सरकार मध्ये हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणात दूध नेऊन दाखवावे असे आव्हान स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिले. बार्शी (जि. सोलापूर) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

बार्शी (सोलापूर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जमा करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 16 जुलै पासून दूध बंद आंदोलन सुरू करत असून या सरकार मध्ये हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणात दूध नेऊन दाखवावे असे आव्हान स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिले. बार्शी (जि. सोलापूर) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे, तो आत्महत्येच्या उंभरठयावर आहे. राज्यात प्रतिदिनी दुधाची मागणी 97 लाख लिटर आहे. तर उत्पादन 1 कोटी 34 लाख लिटर आहे. 40 लाख लिटर दुध अतिरिक्त आहे. त्यातच कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून 27 लाख लिटर दुध राज्यात येते. यामुळेच सध्या केवळ 15 ते 17 रुपये भाव मिळतो. या बाबत सरकारला वेळोवेळी राजू शेट्टी यांनी दूध व्यवसाय अडचणीत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. 

कर्नाटक, गुजरात, केरळ राज्याच्या धर्तीवर दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा करावे अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने आंदोलनात फूट पाडण्यासाठी निर्यात होणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये तर दूध पावडर ला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना होणार नसून काही दूध संघांना याचा लाभ होणार आहे. हा निर्णय म्हणजे केवळ धूळफेक आहे. एका बाजूस सरकार दुधाला 27 रुपये दर द्या असे म्हणते पण हा दर न देणाऱ्या दूध संघांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. 

दूध दरा बाबत दूध संघ मधे नको तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान मिळाले पाहिजे. सरकारने हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास, जबरदस्तीने दूध नेण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी संघटना जशासतसे उत्तर देईल. शेतकऱ्यांनी दुधाच्या बाबतीत सरकारशी असहकार पुकारला असून सरकारला नाक घासत दूध उत्पादक शेतकऱ्यांनकडे यावे लागेल असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला. 

यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोफळे, नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, मराठवाडा प्रवक्ते गोरख गोरे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीदादा पाटील, माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, बार्शी तालुकाध्यक्ष हणमंत कापसे, अखिल भारतीय किसान सभेचे लक्ष्मण घाडगे, नानासाहेब पाटील, रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे हणमंत भोसले पाटील, संतोष चौधरी, मच्छिंद्र काटेगांव, मल्हारी हजारे, व्यंकटेश हजारे, प्रवीण मस्तुद, ज्ञानदेव ढेंगळे, उत्तम हजारे, माढा तालुका युवा आघाडी अध्यक्ष दिनेश गाडेकर, महावीर सावळे, बापू गायकवाड, दत्तात्रय पंडीत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: If the government has the courage then take the milk in the police protection said tupkar