प्रसंगी "एनडीआरएफ'ची मदत घेणार : श्‍वेता सिंघल

प्रसंगी "एनडीआरएफ'ची मदत घेणार : श्‍वेता सिंघल

सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सरासरीच्या 103 टक्के पाऊस झाला आहे. पाणीपातळी नियंत्रणासाठी सर्वच धरणांतून पाणी सोडले आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या वाढे, वडूथ, धोम कालवा व तांबवे या चार पुलांवरील वाहतूक बंद केली आहे. मेणवली, सिद्धनाथवाडी, कऱ्हाड शहरातील सखल भागातील काही कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. संभाव्य पूरसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यास "एनडीआरएफ'ची मदत घेतली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 
जिल्ह्यात गेला आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाळमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा, महाबळेश्‍वर, पाटण, जावळी व पाटण तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती श्‍वेता सिंघल यांनी दिली. त्या म्हणाल्या, ""हवामान विभागाने आगामी चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आजअखेर जिल्ह्यात 866.36 मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या 103.85 टक्के आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी उरमोडी वगळता उर्वरित सर्व प्रमुख धरणांतून पाणी सोडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. धोम धरणातून पाणी सोडल्यामुळे पुराचा धोका असल्याने मेणवली, सिद्धनाथवाडीसह इतर गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे. घाटांमध्ये दरडी कोसळत असल्याने अशा ठिकाणी घाटनिहाय नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी रबर बोट, लाइफजॅकेट, लाइफबॉइज, मेगा फोन, इमर्जन्सी सर्च लाइटस्‌ आदी साहित्य उपलब्ध केले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्यास "एनडीआरएफ'च्या पुण्यातील पथकाशी संपर्कात असून नागरिकांना तत्काळ सुविधा उपलब्ध होण्याचे नियोजन केले आहे. नदीकाठी अतिक्रमण केलेल्या व धोकादायक इमारतीतील कुटुंबांना तात्पुरते सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे.'' 
ब्रिटिशकालिन 23 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले असून या पुलांना कोणताही धोका नाही. पण, सद्य:स्थितीत धोकादायक असलेले वेण्णा नदीवरील वाढे, वर्येतील पूल, कृष्णा नदीवरील वडूथ येथील पूल, वाई-मांढरदेव मार्गावरील धोम कालव्यावरील पूल, कोयना नदीवरील तांबवे पूल वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. कोयनेतून पाणी सोडण्यात आल्याने कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेल्याने या पुलांवरील वाहतूक इतरत्र वळवून पुलांच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरडी, डोंगरकडे कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्या-त्या तालुक्‍यांतील शाळांना सुटी जाहीर करण्याची सूचना शिक्षणाधिकारी व शाळा समितीला दिल्या आहेत. धरणांतील अतिरिक्त पाणी दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्‍यांना सोडले जात आहे. 


प्रशासनातर्फे नियंत्रण कक्ष स्थापन 
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी विभागनिहाय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष 24 तास कार्यरत असेल.
मदतीसाठी नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
पोलिस विभाग- (02162) 233833/100
जिल्हाधिकारी कार्यालय- (02162) 232349
जलसंपदा विभाग- (02162) 244681/244481)
बांधकाम विभाग- (02162) 234989
वीज वितरण कंपनी- (02162) 244640, मो. 7875768554


धरणनिहाय पाण्याचा विसर्ग (क्‍युसेकमध्ये) (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) 
कोयना- 60 हजार, धोम- 5 हजार, धोम-बलकवडी- 4,296, कण्हेर- 16,820, तारळी- 6,010, वीर- 60,346. 

.............. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com