नियम मोडल्यास ‘ई चलन’चा दणका

नियम मोडल्यास ‘ई चलन’चा दणका

कोल्हापूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही बरेच वाहनचालक दंड भरण्यास नकार देतात, काही वेळा पोलिसांशी हुज्जत घातली जाते. मात्र, त्यांच्या मदतीला आता ‘ई चलन’ मशिन येणार आहे. याद्वारे ऑनलाईन दंड वसुली होणार असून दंड न भरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. प्राथमिक टप्प्यात कोल्हापूर व इचलकरंजीत याचा वापर होणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरणेच वाहनधारकांच्या हिताचे ठरणार आहे.

मोबाईलप्रमाणे दिसणाऱ्या या ‘ई चलन’ मशीनचा लॉगइन आयडी व पासवर्ड ठरलेला असेल. तसेच यात कॅमेऱ्यासह ‘एटीएम’ व डेबिट कार्ड स्वीप करण्याची सोय असेल. सिग्नलवर किंवा इतर ठिकाणी सेवा बजावताना एखादा वाहनचालक मोबाईलवर बोलत असेल, सिग्नल तोडत असेल इतकेच काय तर झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे केले असेल, याशिवाय अन्य कोणत्याही प्रकाराने मोटार वाहन कायद्याचा भंग केला असेल तर वाहतूक पोलिस संबंधित गाडीच्या क्रमांकाचा मशीनमध्ये फोटो काढेल. यानंतर त्याने केलेल्या गुन्ह्याचे कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसेल.

दंडाची रक्कम वाहनधारकाने एटीएम अथवा डेबिट कार्ड वापरून ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे. रोख रक्कम स्वरूपात ही दंडाची रक्कम भरता येईल. एखादा वाहनचालक दंड भरण्यास नकार देत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन दंडाच्या रकमेची पावती दिली जाईल. एखाद्या व्यक्तीने देशभरात किती वेळा वाहतूक नियमभंग केला, याची कुंडली या मशिनमध्ये असेल. 

दोनपेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमभंग केला असेल तर त्याला तत्काळ नोटीस देऊन त्याचे वाहन ताब्यात घेण्याचे अधिकारही वाहतूक पोलिसांना असेल. कोल्हापूर शहरासाठी नुकतेच असे ४५ मशीन दाखल झाले आहेत. त्याचे पोलिस अधीक्षकांच्या हस्ते वितरण होईल. त्यानंतर कर्मचाऱ्याने मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर सुरू केला जाणार आहे. या मशीनमुळे वाहतूक पोलिसांकडील पावती बुके हद्दपार होणार आहेत. 

बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा वापर शहर वाहतूक शाखेकडून होणार आहे. या ‘ई चलन’ मशिनमुळे तत्काळ दंडाची वसुली होईल. जिल्ह्याच्या शहरी भागात याचा वापर होणार आहे. सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना आज याचे प्रशिक्षण दिले आहे. लवकरच पारंपरिक पावतीबुक बंद करत आहोत. 
- अभिनव देशमुख,
पोलिस अधीक्षक

असे असेल ‘ई चलन’ मशीन..

  •   ‘ई चलन’ मशीन दिसायला मोबाईलसारखे 
  •   लॉगइन आयडी व पासवर्ड ठरलेला असेल
  •   कॅमेऱ्यासह ‘एटीएम’ व डेबिट कार्ड सुविधा
  •   रोख रक्कम दंड भरता येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com