पाण्याचा निचरा न केल्यास बांधकाम परवाना रद्द

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

शहरात विविध ठिकाणी डेंगीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून रुग्णांची आणि संशयित रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील विविध पथके तयार करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून शहरातील त्या-त्या भागात प्रथम उपाययोजना म्हणून पाहणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

सोलापूर- बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न केल्यास संबंधितांचा बांधकाम परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील आदेश आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी  जारी केले आहेत. डेंगी रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत.

दरम्यान, शहरात विविध ठिकाणी डेंगीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून रुग्णांची आणि संशयित रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागातील विविध पथके तयार करण्यात आली असून या पथकांच्या माध्यमातून शहरातील त्या-त्या भागात प्रथम उपाययोजना म्हणून पाहणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

अनेक मिळकतीमधील उघड्यावरील पाण्याच्या टाक्‍या व अन्य साहित्यामधील उघड्यावर ठेवण्यात आलेले पाणी पूर्णपणे काढून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागात कर्मचारी संख्या कमी पडत असल्याने मानधनावरील 20 कर्मचारी नेमण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या तसेच तापाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी घेण्यात आली असून, बाधित रुग्णांचे घर असलेल्या परिसरातही फवारणी व धुरावणी केली जात आहे.

शहरात डेंगी, हिवताप व इतर आजाराचे रुग्ण वाढत असल्याने शहरातील नागरिकांनीही खबरदारीची उपाययोजना घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. बॅरेल किंवा पाणी साठविलेल्या टाक्‍यांवर झाकणे लावावीत. घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. - डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त

Web Title: If the water does not drain then the construction license can be canceled