
0 यमाई तलाव निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र
0 विठ्ठल दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी तुळशी वृंदावनाची निर्मिती
0 मुबलक पाणीसाठा आणि विविध पक्षांची रेलचेल
0 जवळपास 80 हेक्टर क्षेत्रावर तलावाचे बांधकाम
पंढरपूर : हिरवीगर्द झाडी... घनदाट वृक्षराजीमध्ये सुरू असलेला विविध पक्षांचा किलबिलाट... अन् समोर दिसणारे निळेभोर पाणी... हे निसर्ग चित्रण कुठल्या परदेशातील किंवा कोकणातील समुद्र किनाऱ्याचे नाही... तर ते आहे पंढरपुरातील निसर्गाचं लेणं लाभलेल्या यमाई तलाव परिसरातील. त्यातच आता गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने येथील तलावावर विविध पक्षांचेही आगमन झाल्याने हा परिसर निसर्गप्रेमीसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरू पाहात आहे.
या मावशीच्या दहशतीने स्मार्ट सोलापूरकर त्रस्त
स्वातंत्र्यपूर्व काळात बांधण्यात आलेल्या यमाई तलाव परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. येथे नव्यानेच वनविभागाने उभारलेल्या तुळशी वृंदावनामुळे तलावाच्या वैभवात आणखीनच भर पडली आहे. जवळपास 80 हेक्टर क्षेत्र परिसरात बांधण्यात आलेल्या तलावात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. तलाव काठोकाठ भरल्याने येथे विविध पक्षांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यातच आता गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने अनेक परदेशी पाहुण्यांचे देखील आगमन झाले आहे. सकाळी आणि संध्याकाळी विविध पक्षी भ्रमंतीसाठी तलावाच्या काठावर येतात. त्यामुळे पक्षी निरीक्षकांची आणि निसर्गप्रेमींची पाऊले आपोआप तलावाकडे वळताना दिसत आहेत.
जिल्हाधिकाऱयांचा 'असाही' हिसका दुचाकीस्वारांनी घेतला त्याचा 'धसका'
शहरातील नागरिकांना निसर्गाचे सानिध्य लाभावे, या हेतूने नगरपालिकेने यमाई तलाव परिसराचा रचनात्मक विकास केला आहे. तलावाच्या बाजूने सुमारे दीड किलोमीटरचा रस्ताही तयार केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची झाडे लावली आहेत. तलावाचा काठ आता विविध वृक्षवेलींनी समृद्ध झाला आहे. त्यामुळे विविध पक्षांचा अधिवास देखील वाढला आहे. येथील निसर्गाची मजा लुटण्यासाठी शहरातील अनेक नागरिक सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून तलाव परिसरात गर्दी करतात. येथील परिसर विविध पानाफुलांनी आणि वृक्षांनी नटल्यामुळे पर्यटकांची आणि निसर्गप्रेमीची गर्दी वाढली आहे. निसर्गाचं कोंदण लाभलेल्या यमाई तलाव परिसरातच वनविभागाने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तुळशी वृंदावनाची निर्मिती केली आहे. गेल्या वर्षभरात राज्यभरातील लाखो वारकऱ्यांनी येथे भेट देवून येथील निसर्ग आणि आध्यात्मिक पर्यटनाचा आनंद लुटला आहे.
नव्या शैक्षणिक धोरणामुळे 'ही' प्रक्रिया होणार आता बंद
यमाई तलावाची वैशिष्ठे
- 1874 साली तलावाची निर्मिती
- जवळपास 80 हेक्टर परिसरात तलावाची बांधणी
- 89 हजार 330 क्युसेक इतकी पाणीसाठवण क्षमता
- स्थानिक व स्थलांतरित पक्षांचे आश्रयस्थान
- 60 स्थानिक तर 45 स्थलांतरित पक्षांची तलाव परिसरात नोंद
- राज्य शासनाच्या सरोवर विकास प्रकल्पांतर्गत तलावाचे सुशोभीकरण
स्थलांतरित पक्षांसाठी माहेरघर
यमाई तलाव परिसर हा स्थानिक व स्थलांतरित पक्षांसाठी माहेरघर आहे. थंडीची चाहूल लागली की बदके, करकोच येथे वास्तव्यास येतात. शिवाय चक्रवाक, परी, नकटा, बदक, चिखल्या या प्रकारच्या बदकांसह धोबी, नदीसुरय, तुतुवार, पाणटिवळे, मधुबाज हे पक्षी समुद्रावरुन प्रवास करून या ठिकाणी येतात. पूर्वी फ्लेमिंगो व इतर पक्षी यायचे. पक्षांच्या भ्रमंतीसाठी आणि वास्तव्यासाठी हा तलाव वरदान आहे. मात्र, तलावाभोवतीच्या जनवस्तीमुळे हे पक्षीतीर्थ धोक्यात आले आहे.
- डॉ. अरविंद कुंभार, अभ्यासक, पक्षी व पर्यावरण