राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास नायकवडी यांचे निधन

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष  इलियास नायकवडी यांचे निधन

मिरज - मिरजेच्या राजकारणातील धुरंधर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष इलियास युसूफ नायकवडी (वय ८३) यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांचे ते वडील होत.  

आष्टा येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नायकवडी यांनी कामेरीत उर्दू शिक्षक म्हणून नोकरी केली होती. ते बदलीमुळे सहकुटुंब मिरजेला आले. पुढे उर्दू भाग शिक्षणाधिकारी आटपाडी, कवठेमहांकाळ येथे काम केले. नोकरीदरम्यान राजकारणाकडे वळले. लोकनेते (कै.) राजारामबापू पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पुढाकाराने पुरोगामी शिक्षक समिती स्थापन झाली. या माध्यमातून शिक्षक बॅंकेचीही स्थापना झाली. ते १९७८ मध्ये पूर्णवेळ राजकारणात आले.

मोहनराव शिंदे यांच्याविरोधात जनता पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली. त्यांना ‘जनाब’ या नावानेच सारे शहर ओळखायचे. आझाद शिक्षण संस्थेमार्फत जवाहर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अरबी उर्दू मराठी शाळा अशा संस्थांतून हजारो मुस्लिम मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले केले. तत्कालीन नगरपालिका व सध्याच्या महापालिकेतही त्यांचा सक्रिय राजकीय सहभाग राहिला. सून वहिदा नायकवडी व पुत्र इद्रिस नायकवडी यांना नगराध्यक्ष केले. कुटुंबातील तीन-तीन नगरसेवक एकाचवेळी महापालिकेत पाठवले.

इद्रिस नायकवडी यांना महापौर करण्यातही त्यांचा वाटा राहिला. त्यांनी मिरज नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले होते. प्रवाहाविरुद्ध जाण्याचा त्यांचा स्थायीभाव होता. भाषणात वेगवेगळी उदाहरणे व कथा सांगून सभा जिंकण्याचे कसब त्यांच्याकडे होते. इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक अशीही त्यांची ओळख होती. गेले दीड महिने त्यांच्यावर वॉन्लेस रुग्णालयात उपचार सुरू होते.

जनाब इलियास नायकवडी यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. जनाब नायकवडी यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे.
- आमदार जयंत पाटील,
प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com