शहापुरात 820 नळ कनेक्‍शन चोरीची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

इचलकरंजी - पालिका निवडणूक काळात चार महिन्यांत शहापूर परिसरात तब्बल 820 अनधिकृत नळ कनेक्‍शन दिल्याचे पालिका प्रशासनाने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे. शहरात तब्बल 10 हजार नळ कनेक्‍शन अनधिकृत असल्याचा संशय प्रशासनाला आहे. अनधिकृत नळ कनेक्‍शन देणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांनी दिली.

शहरात 55 हजार मिळकतधारक, तर 65 हजार कुटुंबे आहेत. केवळ 45 हजार नळ कनेक्‍शन आहेत. त्यामुळे अनधिकृत नळ कनेक्‍शनची संख्या मोठी असल्याचा संशय पालिका प्रशासनाला आला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाने याबाबतचा शहापूर परिसरात सर्व्हे केला. यामध्ये मुख्य जलवाहिनीला चार महिन्यांत तब्बल 820 अनधिकृत नळकनेक्‍शन दिल्याचे उघडकीस आले. गळती व इतर कारणांमुळे मुळात कमी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे अनेक भागात टंचाई उद्‌भवते. दुसरीकडे अनधिकृत नळ कनेक्‍शनची खिरापत वाटली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे नियोजनच कोलमडत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षाअखेरीस पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या काळात अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात विकास कामे केली. यामध्ये काहींनी स्वखर्चातून कूपनलिका खोदली, तर काहीजणांनी स्वखर्चातून रस्ते व गटारी करून दिल्या. याच प्रमाणे अनेकांनी पालिकेतील यंत्रणेला हाताशी धरून अनधिकृत नळ कनेक्‍शन देण्याचा सपाटा लावला. त्याचा आता पर्दापाश झाला आहे. केवळ एका भागात 820 नळ कनेक्‍शन अनधिकृत असल्याचे आढळले. यामुळे पालिका प्रशासन हादरले आहे. याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. याचप्रमाणे शहरातील अन्य भागातही अनधिकृत नळ कनेक्‍शन देण्यात आल्याचा संशय प्रशासनाला आहे.

शहरात सुमारे 10 हजार अनधिकृत नळ कनेक्‍शन असण्याची शक्‍यता आहे. कनेक्‍शन देताना कोणतीही कागदपत्रे पालिकेकडे सादर केलेली नाही. त्याचे शुल्क भरलेले नाही. या प्रकरणी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, इचलकरंजी नगरपालिका

दृष्टिक्षेपात ग्राहक
- एकूण 55 हजार मिळकतधारक
- शहरात 65 हजार कुटुंबे
- अधिकृत नळकनेक्‍शन केवळ 45 हजार

Web Title: illegal 820 water connection