बेकायदेशीर गर्भपात प्रकरणः डॉ. विजयकुमार चौगुलेस अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

सांगली - गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पसार असलेल्या डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४५, सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, फेडरल बॅंकेसमोर, विश्रामबाग) यास पोलिसांनी अटक केली. डॉ. स्वप्नील जमदाडे अद्याप पसार असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.

सांगली - गणेशनगरमधील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पसार असलेल्या डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४५, सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, फेडरल बॅंकेसमोर, विश्रामबाग) यास पोलिसांनी अटक केली. डॉ. स्वप्नील जमदाडे अद्याप पसार असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.

दरम्यान, रुग्णालयातील दोन महिला व एक पुरुष अशा तीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. 
चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपाताचा अड्डा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी डॉ. रूपाली चौगुलेला अटक केली. त्यावेळी तिचा पती डॉ. विजयकुमार आणि भाऊ डॉ. स्वप्नील हे पसार झाले.

तपासादम्यान मिळालेल्या कागदपत्रे, केसपेपरनुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली. गर्भपात केलेल्या भ्रूणांची नातेवाईकांकडून विल्हेवाट लावली जात असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर नागाव-कवठे (ता. तासगाव) मधील एका शेतात पाहणी केली. आज विजयकुमार यास पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी याप्रकरणाचा आढावा घेतला. स्वप्नीलच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.

नऊ महिलांचे जबाब
गर्भपात करण्यात आलेल्या सांगली-कोल्हापूरमधील आठ महिलांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. तसेच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबाचाही जबाब नोंदवला. या महिलांनी गर्भपात कधी केला? गर्भपात करण्याचे कारण? चौगुले हॉस्पिटलमध्ये कोणी पाठवले? सोनोग्राफी कोठे केली? या सर्व बाबींची माहिती जबाबातून घेण्यात आली. 

पसार डॉक्‍टर कोल्हापूर जिल्ह्यात
पसार असलेला डॉ. विजयकुमार याचे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि इचलकरंजी परिसरात दोन दिवस वास्तव्य होते. काल रात्री उशिरा तो पोलिसांना शरण आला.

अधिकारी-डॉक्‍टर चौकशीच्या फेऱ्यात
गर्भपातप्रकरणी सांगली-कोल्हापूरमधील काही सरकारी अधिकारी आणि डॉक्‍टर चौकशीचा फेऱ्यात आहेत. महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याने  त्यांच्यावर संशयाची सुई आहे. सोनोग्राफी सेंटर आणि चौगुले हॉस्पिटलमध्ये पाठवणाऱ्यांचा यात समावेश  आहे. 

मानवाधिकारी संघटना
जिल्ह्यात वारंवार बेकायदा गर्भपात घडत असलेल्या घटनांतील डॉक्‍टर व संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. संघटनेचे तोहिद शेख, उदय ओंकार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे  की, बेकायदा गर्भपात करणारे डॉक्‍टर, हॉस्पिटल, एजंट, साहित्य पुरवणारे यांच्यावरील खटले जलदगती न्यायालयात चालवून त्यांना वर्षभरात कठोर शिक्षा  व्हावी. आयुक्त व आरोग्य यंत्रणाप्रमुखांवर गुन्हे दाखल करावेत. 

महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा - शिवसेना
चौगुले हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने केली आहे. शहरप्रमुख मानसी शहा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांना निवेदन दिले. या वेळी राधिका जयस्वाल, सुनीता पाटील, रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, प्रभाकर कुरळपकर, संदीप टिंग्रे, बाळासाहेब मगदूम, श्रीकांत माने, सचिन चव्हाण, रावसाहेब घेवारे उपस्थित होते.

Web Title: Illegal Abortion Case Sangli Follow Up