महामार्गावर अवैध दारूविक्री ; भुईंज परिसरातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

पोलिसांची उदासिनता आणि उत्पादन खात्याच्या दुर्लक्षामुळे भुईंज परिसरातील महामार्ग पट्ट्यात अवैध दारूविक्रीत सर्रास वाढ होत आहे. त्यामुळे गरिबांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत.

भुईंज ः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशी-विदेशी दारू खुलेआम विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विक्री करणाऱ्यांची संख्या मोठी असून, त्यांची दहशतही वाढू लागली आहे. परिसरातील महामार्गावर अवैध दारूविक्री सुरू आहे. पोलिसांची उदासिनता आणि उत्पादन खात्याच्या दुर्लक्षामुळे भुईंज परिसरातील महामार्ग पट्ट्यात अवैध दारूविक्रीत सर्रास वाढ होत आहे. त्यामुळे गरिबांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. गावांचे स्वास्थ्यही धोक्‍यात आले आहे. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने दारूबंदीसाठी जोरदार कारवाई करावी, अशी मागणी महिला व नागरिकांतून होत आहे.
 
वाईच्या पूर्व भागातील तालुक्‍याच्या प्रवेशव्दारावरच असणाऱ्या वेळे गावात राजकीय पक्षांच्या वरदहस्ताने विनापरवाना दारूविक्री सुरू आहे. त्याच पध्दतीने जोशीविहीर ते बोपेगाव दरम्यान महामार्गावर असणाऱ्या एका पंचताराकित हॉटेलवर बारमाही रात्रंदिवस देशी, विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. जोशीविहीर येथे चार ठिकाणी देशी दारूची विक्री सुरू आहे. तेथे पोलिसांची कारवाई होते. मात्र, एका तासातच पुन्हा तेथे विक्री सुरू होते.
आनेवाडी टोलनाका दरम्यान पाचवडमधील खड्डेवाडी तसेच बेघरवस्तीसह अमृतवाडीनजीक वाई-जावळी तालुक्‍याच्या सीमेवर कालव्यावर, असले तेथे बसस्टॉपवर जोमात दारूविक्री सुरू आहे. अशा प्रकारे वाई तालुक्‍याच्या पूर्व भागात विविध ठिकाणी अवैध धंद्यांना ऊत आला असून, पोलिसांच्या कृपेने अवैध धंद्यांनी घातलेला विळखा अधिकच घट्ट होत आहे. बेकायदा दारूविक्री पानटपऱ्या, किराणा मालाची दुकाने, हॉटेल तर काहींनी घरातच सुरू केली आहे. त्यामुळे शासनाला कर भरणाऱ्या परवानाधारक दारूविक्रेते व बिअरबारवाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

गावागावांत अनेक अवैध ठिकाणी सर्व प्रकारची (देशी-विदेशी) दारू मिळत असल्याने अधिकृत विक्रेत्यांना त्याची झळ सोसावी लागत आहे. अवैध धंदेवाल्यांकडून नेहमीच्या ग्राहकाला घरपोच सेवा दिली जात आहे. या अवैध धंदेवाल्यांना राजकीय अभय मिळत असून, त्याशिवाय झिरो पोलिस मदतीसाठी तत्परसेवा बजावतच असतात. सध्या विधानसभा निवडणुका सुरू असून, या निवडणुकांमुळे अवैध धंदेवाल्यांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या निवडणुकीच्या कारणास्तव होत असलेली अवैध धंद्यावरील कारवाई बारामाही सुरू ठेवून हे धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. 

जावळीत दारूच्या हद्दीपारीला हरताळ 

महिलांनी दारू हद्दपार केलेला राज्यातील पहिला तालुका जावळी आहे. मात्र, आता तेथे पोलिसांच्या मूकसंमतीने अवैध धंदेवाल्यांनी बस्तान बसविले असून, महिलांनी व सामाजिक संस्थांनी उभारलेल्या लढ्याला हरताळ फासला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal alcohol sales on the highway