अवैध व्यवसायांचा संग्रहालयाला विळखा

उमेश बांबरे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सातारा - छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नूतन इमारतीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्त्व विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने या भुईकोट किल्ल्याप्रमाणे उभ्या असलेल्या इमारतीला अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे. तळीराम, जुगार व्यवसायासह प्रेमीयुगुलांना भेटण्याचे ठिकाण अशी या इमारतीची अवस्था झाली आहे. 

सातारा - छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नूतन इमारतीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्त्व विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने या भुईकोट किल्ल्याप्रमाणे उभ्या असलेल्या इमारतीला अवैध धंद्यांचा विळखा पडला आहे. तळीराम, जुगार व्यवसायासह प्रेमीयुगुलांना भेटण्याचे ठिकाण अशी या इमारतीची अवस्था झाली आहे. 

जिल्हा प्रशासनासह पोलिसांनीही या वास्तूमधील या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मराठेशाहीतील १६ ते १८ व्या शतकांतील कला, संस्कृती व इतिहासाची परंपरा आजच्या पिढीसमोर मांडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची इमारत येथील हजेरी माळ मैदानावरील सहा एकर जागेत उभारली आहे. साधारण साडेसहा कोटी रुपये खर्च करून भुईकोट किल्ल्याप्रमाणे इमारत उभी राहिली. त्यानंतर बांधकाम विभागाने ही इमारत पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केली. पुरातत्त्व विभाग यामध्ये अंतर्गत सजावटीचे काम करणार होता. पण, निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा कमी पडल्याने आता या इमारतीला वाली कोण, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. याचा फायदा उठवत अवैध धंदेवाल्यांसाठी ही इमारत सोयीचे ठिकाण बनले आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मध्यंतरी या इमारतीची पाहणी करून बांधकाम व पुरातत्त्व विभागाला अंतर्गत सजावटीचे काम सुरू करण्याची व निधी उपलब्धतेबाबतही सूचना केली होती. पण, पुढे कोणतीही हालचाल झालेली नाही. 

सध्या या इमारतीच्या भोवतालच्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. काहींनी परिसरात लावण्यात आलेली झाडेही तशीच फेकून दिली आहेत. तळीराम या इमारतीत बसून पार्ट्यांचा आनंद घेत आहेत. मागील बाजूने इमारतीत येण्यासाठी एक पाऊलवाट असून, त्यातून आत येऊन जुगार अड्डाही चालतो. तसेच प्रेमीयुगुलांना ही इमारत सुरक्षित ठिकाण वाटत असल्याने दुपारी व सायंकाळच्या सुमारास येथे अनेक प्रेमीयुगुले चाळे करत आपले प्रेम व्यक्त करत बसतात. यासंदर्भात साताऱ्यातील काही सुजाण नागरिकांनी या इमारतीत चालणाऱ्या अवैध धंद्यांबाबत पोलिसांशी संपर्क करून माहितीही दिली. पण, पोलिस दुर्लक्ष करत आहेत.

नऊ वर्षे काम रखडले
२००५ ते  २००९ पर्यंत अनेकदा इमारतीचा आराखडा बदलला. २००९ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. गेल्या नऊ वर्षांतही या संग्रहालयाचे काम पूर्णत्वाला गेले नाही. अनेकदा निधी देण्याची आश्‍वासने मिळाली. त्यातून निधी मिळालाही; पण काम अपूर्ण राहिले. आजही ही इमारत ओस पडलेल्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे उभी आहे.

Web Title: illegal business musium police