मायणीमध्ये अवैध धंद्यांना राजाश्रय

संजय जगताप 
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

मायणी : जीवघेणा गुटखा व आयुष्यच उद्‌ध्वस्त करणारा मटका यांसह जुगार, दारूविक्री, दूध भेसळ यांसह अनेक बेकायदा धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उद्‌ध्वस्त कऱणाऱ्या त्या काळ्या धंद्याकडे राजकीय दबावामुळे पोलिसही कानाडोळा करीत आहेत. 

मायणी : जीवघेणा गुटखा व आयुष्यच उद्‌ध्वस्त करणारा मटका यांसह जुगार, दारूविक्री, दूध भेसळ यांसह अनेक बेकायदा धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उद्‌ध्वस्त कऱणाऱ्या त्या काळ्या धंद्याकडे राजकीय दबावामुळे पोलिसही कानाडोळा करीत आहेत. 

मायणीसह परिसरात ठिकठिकाणी मटक्‍याचे एजंट आहेत. त्यांनी या भागातील गावोगावी मटका बुकिंगसाठी जाळे पसरले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मटका घेतला जात आहे. दुष्काळी स्थिती व बेरोजगारी यामुळे मायणी, कलेढोण, कातरखटाव, चितळी आदी मोठ्या गावांतील तरुण मोठ्या संख्येने अवैध धंद्याकडे वळताना दिसत आहेत. काळ्या धंद्यांची पोलिसांना माहिती आहे. मात्र, राजकीय दबावामुळे कारवाई करण्यास ते धजावत नसल्याचे चित्र आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष गोसावी यांनी येथे हजर होताच दारूबंदीसह विविध काळ्या धंद्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. मात्र, आठवड्यातच त्यांना मोहीम गुंडाळावी लागली. त्यामुळे सुरवातीला सिंघमची उपमा देणारे लोकच आता त्यांच्या कर्तृत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

कार्यपद्धतीवर टीका टिप्पणी करीत आहेत. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे, कारवाईचा फार्स करण्याने दिवसेंदिवस काळ्या धंद्यात वाढच होत आहे. दरम्यान, आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यावर तर शासनाने बंदी घातली असताना सर्रास गुटखा विकला जात आहे. मटका व गुटखा विक्रेते, एजंटना राजाश्रय असल्याने बिनदिक्कत कोणालाही न जुमानता ते धंदा करीत आहेत. मटका व गुटख्याचा धंदा येथे जोमात सुरू असून बेकायदा दारू विक्रीतही वाढ झाली आहे. परिसरातील गावोगावचे लोक येथील विविध हॉटेल, ढाब्यांवर मद्यपानासाठी येत आहेत. परिणामी काळ्या धंद्यात दररोज लाखोंची कमाई होत आहे. त्या पैशांचा गैरवापर होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. 
पाळेमुळे खणून काढा

पोलिसांनी मायणीसह परिसरातील अशा सर्वच बेकायदा व्यवसाय, काळ्या धंद्यांची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: illegal businesses mayni