कासमधून बेकायदा उत्खनन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

सातारा - कास तलावालगत मातीसाठी बेकायदा उत्खनन करून लाल माती चोरीस गेली आहे. यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांत पावसाळ्यात पाणी साचून दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे १५ फूट खोल व ३० फूल लांबीचा हा खड्डा पर्यटकांसाठी धोक्‍याची घंटा ठरला आहे. 

सातारा - कास तलावालगत मातीसाठी बेकायदा उत्खनन करून लाल माती चोरीस गेली आहे. यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांत पावसाळ्यात पाणी साचून दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुमारे १५ फूट खोल व ३० फूल लांबीचा हा खड्डा पर्यटकांसाठी धोक्‍याची घंटा ठरला आहे. 

कास तलाव व परिसरातील सुमारे १०५ हेक्‍टर क्षेत्र सातारा पालिकेच्या मालकीचे आहे. याच तलावातून शहराला पाणीपुरवठा होतो. तलावातील पाण्याच्या बाजूची जमीन दाट वनक्षेत्राने अच्छादली आहे. या जमिनीतील माती जेसीबीने उपसून चोरून नेली जाते. कास बंगल्यापासून निघणाऱ्या रस्त्याने खाली, पाण्याच्या दिशेने गेले की उजव्या बाजूस दाट झाडीत चार मोठ्ठे खड्डे दिसतात. चार ते पाच ट्रक आरामात लपून राहू शकतील, एवढ्या मोठ्या आकाराचे हे खड्डे आहेत. याच ठिकाणी माती उत्खनन करून पाचवा खड्डा निर्माण करण्यात आला आहे. शेकडो ब्रास गौणखनिजाची ही चोरी आहे. ही माती ग्रीनहाउस अथवा मैदान तयार करण्याकरिता वापरली जाते. माती काढल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यात पावसाळ्यात अजानतेपणी एखादा पर्यटक पडून दुर्घटना घडण्याचा धोका आहे. 

मालकी क्षेत्रात होत असलेली चोरी दिसत असूनही पालिका प्रशासन व पदाधिकारी काहीच करत नाहीत. त्यातूनच त्यांची हतबलता स्पष्ट होते. ही जागा पालिकेच्या मालकीची आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत म्हणजे कास तलाव आहे. विघ्नसंतोषी लोकांपासून तलावाच्या रक्षणासाठी पालिकेने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. 

पालिकेचे उत्पन्न वाढू शकते
पालिकेने ठराविक अटींवर कास परिसराच्या देखभालीची जबाबदारी एखाद्या एजन्सीला द्यावी. येणाऱ्या पर्यटकांकडून ही एजन्सी पर्यावरण शुल्क घेईल. त्यातून कास तलाव व परिसराची नियमित स्वच्छता ठेवली जाईल. वृक्षतोड, मद्यपान करून धिंगाणा, गौण खनिज चोरी आदी गैरप्रकार करणाऱ्यांना प्रतिबंध बसेल. पालिकेलाही त्यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकते.

Web Title: illegal digging in kas