बेकायदा वाळूउपसा जोमात... प्रशासन कोमात!

संजय जगताप
बुधवार, 14 डिसेंबर 2016

येरळा व चांद नदीत अखंड वाळूउपसा सुरूच; स्थानिक नागरिकही गप्प

मायणी - खटाव तालुक्‍याची जीवनदायी असलेल्या येरळा नदीसह मायणीतून वाहत जाणाऱ्या चांद नदीत ठिकठिकाणी वाळूचा अखंड उपसा सुरू आहे. त्याकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसते. स्थानिक नागरिकही मूग गिळून गप्प बसत असल्याने बेकायदा वाळू उपशावर कारवाई कोण अन्‌ कधी करणार, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

येरळा व चांद नदीत अखंड वाळूउपसा सुरूच; स्थानिक नागरिकही गप्प

मायणी - खटाव तालुक्‍याची जीवनदायी असलेल्या येरळा नदीसह मायणीतून वाहत जाणाऱ्या चांद नदीत ठिकठिकाणी वाळूचा अखंड उपसा सुरू आहे. त्याकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसते. स्थानिक नागरिकही मूग गिळून गप्प बसत असल्याने बेकायदा वाळू उपशावर कारवाई कोण अन्‌ कधी करणार, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

येरळा नदीच्या उगमापासून ते नेर तलाव, पुसेगाव ते येरळवाडी तलाव व अंबवडे ते चितळी हा येरळवाडी तलावाच्या खालचा भाग अशा तीन टप्प्यात येरळा नदीत ठिकठिकाणी वाळू उपसा अखंडपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे मायणी तलावापासून निघणारी चांद नदी येरळेला मिळेपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी वाळूचा उपसा करण्यात येत आहे. वाळूला मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने वाळूचे दर गगनाला भिडले आहेत. पाच ते सहा हजार रुपये प्रति ब्रास दर असल्याने नदीकाठच्या गावांतील अनेक तरुण बेकायदा वाळू उपशाकडे वळले आहेत. वाळूच्या व्यवसायासाठी अनेकांनी ट्रॅक्‍टर, जेसीबी, डंपर खरेदी केले आहेत. मागणीनुसार रात्रीच्याच वेळी वाळूचा संबंधित गिऱ्हाईकांना पुरवठा केला जात आहे. काही जण तर वाळू नदीतच चाळून घेत आहेत. चाळलेल्या वाळूला चांगला दर मिळत आहे. वाळू उपसा होत असल्याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली तरी संबंधित अधिकारी कानावर हात ठेवत आहेत. पोलिसांना त्याबाबत माहिती दिली तरी संबंधितांवर कारवाई होताना दिसत नाही. त्याउलट वाळूबाबत तक्रार करणाऱ्यांनाच त्रास देण्यात येत असल्याची उदाहरणे आहेत. वाळू उपसा करून ती बेकायदा विक्री करणाऱ्यांचेही जबरदस्त नेटवर्क आहे. कारवाईची शक्‍यता वाटल्यास संबंधित तेथील साहित्य, वाहने अन्यत्र हलवली जात आहेत. निर्मनुष्य ठिकाणी अडगळीत वाळूचे साठे करून ठेवले आहेत. तेथून मागणीनुसार वाळूचा पुरवठा करण्यात येत आहे. 

प्रशासनाकडून कडक कारवाईची अपेक्षा
सततच्या वाळू उपशामुळे नदीकाठ व परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावू लागली आहे. नदीत ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत. अपरिमित वाळू उपशामुळे ५०० ते एक हजार फूट खोल गेल्याशिवाय कूपनलिकांना पाणी लागत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह तालुका प्रशासनाने बेकायदा वाळूउपसा थांबवण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक आहे.        

Web Title: illegal sand mining