अवैध प्रवासी वाहतूक आता रोखाच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

कोल्हापूरचे रद्द झालेले रिक्षा परवाने पुन्हा मिळवून दिले. नागपूर-औरंगाबाद येथील तीन आणि सहाआसनी रिक्षाचालकांतील वाद कायद्याच्या चौकटीतून मिटविला. आता कोल्हापुरातही दोन पथकांद्वारे कारवाई सुरू केली आहे. या वेळी काही जण बघून घेतो, अशी धमकी देतात. यावरून जिल्हा कोणत्या मार्गावर चालला आहे हे दिसते. नगरसेवक, सभापतींनी, रिक्षाचालकांनी मला कार्यालयात दिलेल्या वागणुकीबद्दल परिवहन आयुक्तांनी दखल घेतली. तुम्ही गुन्हे का दाखल केले नाहीत, अशी विचारणा केली. 
-डॉ. डी. टी. पवार

कोल्हापूर - अवैध प्रवासी वाहतूक रोखून कोल्हापूर स्वच्छ करा, अशी  मागणी आज सर्व तीनआसनी प्रवासी रिक्षा संघटनांनी निवेदनाद्वारे  प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांच्याकडे केली. अवैध वाहतूक रोखण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

शहरातील अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाचे सभापती नियाज खान, स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने डॉ. पवार यांच्याकडे मागणी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी चार पथकांद्वारे वडापच्या रिक्षाचालकांवर कारवाई झाली. त्यामुळे वडापच्या रिक्षाचालकांनी डॉ. पवार यांची भेट घेऊन कोणाच्या दबावाखाली कारवाई करू नका, आमच्याबरोबर सर्वच अवैध वाहतुकीवर कारवाई करा, अशी मागणी केली. या वेळीही डॉ. पवार यांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होणारच असल्याची भूमिका घेतली. या भूमिकेचे तीनआसनी रिक्षाचालक संघटनांकडून आज स्वागत झाले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सर्व तीनआसनी प्रवासी रिक्षा वाहतूक संघटनेच्या सदस्यांनी डॉ. पवार यांची भेट घेतली.

या वेळी सुभाष शेटे म्हणाले, ‘‘अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अस्वच्छ झालेले शहर स्वच्छ करण्याचे काम डॉ. पवार यांनी हातात घेतले आहे. आजपर्यंत पहिल्यांदाच सर्व तीनआसनी प्रवासी रिक्षा संघटना एकत्रितपणे त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमल्या आहेत. त्यांचे बळ आता डॉ. पवार यांच्या पाठीशी आहे. त्यांनी अवैध प्रवासी वाहतूक रोखून सर्वांचा विश्‍वास सार्थ ठरवावा.’’

ॲड. बाबा इंदुलकर यांनी डॉ. पवार यांच्या अवैध प्रवासी वाहतूक रोखण्याच्या भूमिकेबद्दल अभिनंदन करून ते म्हणाले, ‘‘रिक्षाचालकांचा दिवसाकाठी पाचशे रुपयांचा व्यवसाय होतो. सेवा होते. त्यापैकी सव्वाशे रुपयांचे पेट्रोल, सव्वाशे रुपयांचा हप्ता आणि इतर खर्च जाऊन १२ तास राबून केवळ सव्वाशे रुपये घरी घेऊन जातो. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक रोखल्यास अधिक सेवा देता येईल. रिक्षाचालकाला किमान साडेसात-आठशे रुपये घरी घेऊन जाता येतील. डॉ. पवार तुम्ही अवैध प्रवासी वाहतूक रोखा. त्यासाठी आमच्या सर्व तीनआसनी प्रवासी वाहतूक रिक्षा संघटनांचा पाठिंबा आहे. कोल्हापूर स्वच्छ करा.’’

विजय गायकवाड यांनीही आरटीओंनी घेतलेली भूमिका समाजहिताची आहे. त्यामुळेच आम्ही जाहीर पाठिंबा देत असल्याचे सांगितले. मोटार वाहन निरीक्षक ए. के. पाटील आणि प्रदीप गुरव उपस्थित होते.

शिष्टमंडळात अविनाश वांद्रे, भिकाजी दाभाडे, उदय भास्कर, संजय गवळी, आशीष जाधव, चंदू पाटील, शरबुद्दीन शेख यांच्यासह सुमारे दीड-दोनशे चालक उपस्थित होते.

Web Title: Illegal transportation of passengers issue