उदयनराजेंनी टोचले प्रशासनाचे कान!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

सातारा - सुमारे पन्नास लाख रुपयांहून अधिक खर्चाचे प्रतापसिंहराजे फळ व भाजी संकुल बांधूनही मंगळवार तळे रस्त्यावर सायंकाळी बेकायदेशीर भाजी मंडई भरत होती. या संदर्भात आलेल्या तक्रारीची दखल घेत दस्तूरखुद्द उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाचे कान टोचल्यानंतर मंगळवार तळे रस्त्यावरील बेकायदा भाजी मंडई तूर्तास बंद झाली आहे..! 

सातारा - सुमारे पन्नास लाख रुपयांहून अधिक खर्चाचे प्रतापसिंहराजे फळ व भाजी संकुल बांधूनही मंगळवार तळे रस्त्यावर सायंकाळी बेकायदेशीर भाजी मंडई भरत होती. या संदर्भात आलेल्या तक्रारीची दखल घेत दस्तूरखुद्द उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाचे कान टोचल्यानंतर मंगळवार तळे रस्त्यावरील बेकायदा भाजी मंडई तूर्तास बंद झाली आहे..! 

चांदणी चौकातून मंगळवार तळ्याकडे जाणारा रस्ता कायम वर्दळीचा आहे. मंगळवार तळे परिसर, यादोगोपाळ, भवानी पेठ, चिमणपुरा- व्यंकटपुरा, धुमाळ आळी- गडकर आळी, शाहूपुरी, महादरे, रामाचा गोट, शुक्रवार पेठ या भागातील नागरिकांसाठी हा नेहमीचा मार्ग आहे. शिवाय या भागात अनंत इंग्लिश स्कूल, केशवराव गोरे, अण्णासाहेब राजेभोसले अशा पाच शाळा आहेत. 

पालिकेने हा रस्ता २००८ मध्ये ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केला. मात्र, चांदणी चौकापासून विठोबाच्या नळापर्यंत या रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असतात. त्यातच फळविक्रेत्यांच्या हातगाड्याही उभ्या असतात. ५० लाखांहून अधिक खर्च करून मंडईची इमारत उभारली असतानाही मंडईतीलच काही विक्रेते ॲपे रिक्षा घेऊन रस्त्यावर उभे राहतात. ते रस्त्यावर येतात म्हणून इतर विक्रेते कुटुंबातील सदस्यांना काही माल देऊन रस्त्यावर दुकान लावतात. शाहू कलामंदिर कोपरा, गवई विठ्ठल मंदिर याठिकाणी भाजी विक्रेत्यांची नेहमीच गर्दी असते. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. 

या संदर्भात प्रतापसिंह महाराज भाजी मंडईतील काही विक्रेत्यांनी यापूर्वी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले गेले नाही. तक्रार झाली की एक-दोन दिवस कारवाई व्हायची. पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी परिस्थिती दिसायची. रस्त्यावरील कोंडी कमी होण्यासाठी पाठपुरावा करण्याएवढा सर्वसामान्य नागरिकांकडे वेळ नाही. त्यामुळे मंडईतील काही विक्रेत्यांनीच दस्तूरखुद्द खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन देऊन साकडे घातले. त्याचा सकारात्मक परिणाम गेल्या काही दिवसांत दिसू लागला आहे. अर्थातच पालिका प्रशासन आपल्या कारवाईत किती दिवस सातत्य ठेवतंय, यावरच हे यश अवलंबून आहे.  

रिक्षातील विक्रेत्यांना अडवणार कोण ! 
मोक्‍याच्या ठिकाणी मालवाहतूक रिक्षा उभ्या करून भाजी विक्री करण्याचा फंडा काही व्यापारी भाजी विक्रेत्यांनी अवलंबला आहे. मंगळवार तळे रस्ता व चांदणी चौकातील कोपऱ्यावर रात्री आठ वाजल्यानंतर या रिक्षा दिसतात. पालिका प्रशासनाला अशा वाहनांवर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. आरटीओ व शहर वाहतूक पोलिसांना संबंधित वाहनांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासनाने सुचवूनही गेल्या वर्षभरापासून एकाही वाहनावर कारवाई झालेली नाही.  

Web Title: illegal vegetable market close