अनधिकृत नळ कनेक्‍शनला ‘अभय’

अनधिकृत नळ कनेक्‍शनला ‘अभय’

इचलकरंजी - शहरातील अनधिकृत नळ कनेक्‍शन घेतलेल्या नागरिकांसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या पालिका सभेत वादळी चर्चेनंतर घेण्यात आला. दुसरीकडे १०० रुपये अनामत भरून नळ कनेक्‍शन देण्याची योजना बंद करण्यावर आज शिक्कामोर्तब झाले. या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी केली होती. यावर मतदान घेऊन सत्तारूढ गटाने २६ विरुद्ध २० अशा बहुमतांनी चोपडे यांची मागणी फेटाळली. 

सुमारे तीन तास चाललेल्या सभेमध्ये रस्ते खोदाई, प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातील कथित भ्रष्टाचार, भुयारी गटारीचे रेंगाळेलेले काम, सोलर सिटी प्रकल्प, आयजीएम रुग्णालयातील अनियमित कर्मचारी आदी विषयांवरून सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या. 

शहरातील अनधिकृत नळ कनेक्‍शनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी अभय योजना राबविण्याची मागणी नगरसेवक चोपडे यांनी केली होती. या संदर्भात झालेला सर्व्हे बोगस असल्याचा आरोप चोपडे यांनी केला. विभागनिहाय पुन्हा सर्व्हे करून अभय योजनेद्वारे अनधिकृृत नळ कनेक्‍शन अधिकृत करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्याची मागणी केली. या विषयावर सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली. सुरुवातीला विरोध करणाऱ्या सत्तारूढ गटाने नंतर मात्र अभय योजना राबविण्यास सहमती दर्शवली. 

पालिकेने १०० रुपये अनामत भरून नळ कनेक्‍शन देण्याची योजना राबवली होती. त्यास दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची मागणी चोपडे यांनी केली. या मागणीला सत्तारूढ गटाने जोरदार विरोध करून प्रशासनाच्या अहवालानुसार ठराव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चोपडे यांनी केलेली मुदतवाढीची मागणी २६ विरुद्ध २० अशा बहुमताने फेटाळण्यात आली. या निर्णयामुळे नवीन नळ कनेक्‍शन घेताना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीवर काय कारवाई केली, असा सवाल नगरसेविका सायली लायकर यांनी विचारला. याबाबत लिपीक दिलीप पोवार यांना नोटीस बजावली असून खुलासा आल्यानंतर आठ दिवसांत कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांनी सांगितले. नवीन रस्ते खोदाईच्या प्रश्‍नाकडे नगरसेवक संजय केंगार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मदन कारंडे यांनीही यावर आक्रमक भूमिका मांडली. याबाबत पाणीपुरवठा व बांधकाम विभागास समन्वय राखून काम करण्याची सूचना दिल्याचे सभाध्यक्षा स्वामी यांनी सांगितले. 

भुयारी गटारीच्या रेंगाळलेल्या प्रश्‍नाकडे उदयसिंह पाटील यांनी लक्ष वेधले. या चर्चेत सागर चाळके, नितीन जांभळे, अशोक जांभळे, किसन शिंदे, राहुल खंजीरे आदींनी भाग घेतला. या संदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे सौ. स्वामी यांनी जाहीर केले. सोलर सिटी प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्यासाठी ई - निविदा काढण्यास आज मंजुरी देण्यात आली. चोपडे यांनी हा प्रकल्प एका विशिष्ट कंपनीला न देता या कामाचीही ई- निविदा काढण्याची मागणी केली. त्यास सभागृहात मंजुरी देण्यात आली. या विषयावर तानाजी पोवार, रवींद्र माने यांनी भाग घेतला. 

जुने बसस्थानक परिसरात बगीचा विकसित करणे व या जागेच्या मालकी हक्क कोणाचा, यावरून राहुल खंजीरे व उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांच्यात खडाजंगी झाली. आयजीएम रुग्णालयाकडील अनियमित कर्मचाऱ्यांच्या विषयांवरून सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर अनियमित कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत शासन पातळीवर प्रयत्न करण्यावर वादळी चर्चेनंतर सभागृहात एकमत झाले.  
 

दानवेंच्या निषेधाच्या ठरावावरून गोंधळ
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी विरोधकांनी त्यांच्या निषेधाचा ठराव मांडला. मात्र हा ठराव सभाध्यक्षांनी स्वीकारला नाही. त्यामुळे दानवे यांचा निषेध करीत असल्याचे विरोधकांनी जाहीर केले. या वेळी सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात जोरदार वाक्‌युद्ध रंगल्याने सभेत गोंधळ निर्माण झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com