कृष्णा नदीपात्रात "रात्रीस खेळ चाले' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महसूल खात्याने समाजाचे व शासनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वाळू तस्करांचा शोध घेऊन कारवाई करावी व अवैध होणारा वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 
 

भुईंज (जि. सातारा)  : गेल्या साडेचार महिन्यांपासून सतत कोसळलेल्या पावसाने वाई तालुक्‍यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीला आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे तयार झाले आहेत. हे वाळू साठे वाळू तस्करांच्या रडारवर आले असून, रात्रीच्या वेळी जेसीबी, ट्रॅक्‍टरच्या साह्याने हे वाळूसाठे रातोरात गायब केले जात आहेत. 

गेल्या तीन- चार महिन्यांपासून पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीने कृष्णा नदीला अनेक वेळा पूर आला होता. या पुरामुळे नदीकाठच्या शेतजमिनीही पाण्याखाली गेल्या होत्या. त्या जमिनीतही पाण्याबरोबर गेलेली वाळू पसरल्याने सुपीक जमिनीचे नुकसान झाले आहे, तसेच पूर आल्यामुळे नदीकाठच्या जमिनी वाहून जातात. त्याला नदीतून होणारा वाळू उपसा कारणीभूत ठरतो.

पावसाळ्यात वाळू उपशाला बंदी असते. दिवाळीनंतर शासन वाळूचे लिलाव काढते. ठराविक जागेतील वाळू उपसा करण्याचे बंधन वाळू घेणाऱ्या ठेकेदारांवर असते; परंतु या सर्व नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावून हे ठेकेदार अतिरिक्त वाळू उपसा करतात. ऐन पावसाळ्यातही उसंत मिळेल, तेव्हा वाळू उपसा सुरूच असतो.

मात्र, आता नदीला आलेल्या वाळूच्या साठ्यांचे लिलाव अजूनही झाले नाहीत. तोपर्यंत नदीतून वाळू उपसण्याचे सुरू झाले आहे. पाण्यामुळे बारीक वाळू नदीपात्रात जमा झालेली असते. कोणताही त्रास न घेता ही बारीक वाळू विक्रीसाठी नेली जाते. 
सर्व नियम गुंडाळून वाळू तस्कर वाळू उपसा करून शासनाची फसवणूक करीत आहेत.

सर्वसामान्य लोकांच्या जमिनी पुराच्या पाण्याने नापीक होत असताना महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र दुर्लक्ष आहे. सर्वसामान्य लोकांच्या जमिनी पुराच्या पाण्याने नापीक होत असताना स्वतः मात्र हे वाळू तस्कर अतिरिक्त वाळू उपसा करून गब्बर झाले आहेत.

दरम्यान भुईंजनजीक असणाऱ्या नदीतील डोहाशेजारी मोठ्या प्रमाणात वाळू आली असून, ती पळविण्यासाठी प्रशासनाने चारी काढून बंद केलेला रस्ता सुरू करून रात्रीच्या वेळी ट्रॉल्या भरून बाहेर काढल्या जात आहेत. 

या वाळू तस्करांना नेहमीच्या खाकीच्या खात्यातील संरक्षण असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. लाखो रुपये किमतीच्या वाळूची तस्करी या ठिकाणाहून होत असून, काही जागरूक नागरिकांनी त्यांना वाळू वाहतूक करताना रोखलेही होते. मात्र संरक्षण खात्याचे कर्मचारीच बरोबर असल्याने नागरिकांना माघार घ्यावी लागल्याचे उदाहरण देखील आहे.

शेतकऱ्यांना रस्ता बंद... तस्करांना मात्र मुभा 

संबंधित ठिकाणच्या वाळू साठ्यानजीक अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी असून, त्या शेतकऱ्यांना येथून दळणवळणासाठी सोयीचा रस्ता आहे. मात्र, महसूल खात्याने येथे चर काढून तो बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. तर वाळू तस्कर या चरीत भर घालून त्यातून रस्ता करून वाळूची बिनधास्त वाहतूक करीत असल्याचीही तक्रार होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illgeal Things Are Done In Krishna river At Nigh