
फाईन लाइनर या शैलीचे काम करत असताना यामध्ये आपण पेनाच्या साहाय्याने एकाच लाइनमध्ये चित्रण करायचे असते. यामधील चुका पुन्हा सुधारता येत नाहीत, त्यामुळे विचार करून चित्रण करावे लागते.
कोल्हापूर - इलेस्ट्रेशन म्हणजे दृष्टांतचित्रण. पण मला इलेस्ट्रेशन ही एक भावना व्यक्त करणारे साधन वाटते, जसे आपल्या मनातील भावना किंवा आपले विचार दुसऱ्या व्यक्तीला निःशब्दपणे चित्राद्वारे सांगणे म्हणजे इलेस्ट्रेशन. इलेस्ट्रेशनच्या भरपूर शैली आहेत. यापैकी मी फाईन लाइनर ही शैली निवडली आहे. अनेक वर्षे मी या शैलीचा अभ्यास करत आहे. या शैलीमध्ये मी सविस्तर काम करत आहे.
फाईन लाइनर या शैलीचे काम करत असताना यामध्ये आपण पेनाच्या साहाय्याने एकाच लाइनमध्ये चित्रण करायचे असते. यामधील चुका पुन्हा सुधारता येत नाहीत, त्यामुळे विचार करून चित्रण करावे लागते. हे चित्रण करत असताना रेषांचा वापर तर होतोच; पण इतर पोत किंवा छटा यामधून चित्राचे सौंदर्य कसे खुलवता येतील, याचाही विचार करावा लागतो. या चित्रणाचा फायदा आपल्याला वेगवेगळ्या पृष्ठभागावर करता येतो. यामध्ये सतत वापरात असणारे पेपर्स, कलर पेपर्स, कार्ड बोर्ड, माऊंट, भिंत आणि कापडावरसुद्धा करता येतो.
हेही वाचा - चक्क... रेशीम कोषापासून बुके, ग्रींटिग्ज, नेकलेस, ब्रेसलेटची कलाकुसर
या सर्व पृष्ठभागावर वेगवेगळे चित्रण करू शकतो. तसेच प्रत्येक डिझाइनमध्ये थोडासा कलरचा पार्ट पण येतो. त्यामुळे मी वॉटरकलरचा थोडा वापर प्रत्येक डिझाइनमध्ये करत असतो. यासाठी मी फाईन लाइनरचे विविध पॉईंट साइजचे लहान-मोठे वॉटरप्रूफ पेन वापरतो व वॉटर कलर या माध्यमाचा वापर करतो. मी या शैलीतून माझे विचार, भावना, एका चित्रातून प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हे प्रसंग दाखवत असताना प्रत्येक प्रसंगाचा विचार गांभीर्याने करावा. यामुळे चित्रामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी या चित्रातून लोकांसमोर व्यक्त होतील.
वर्षामध्ये अनेक सण साजरे होत असतात. यामधील महत्त्वाचा आणि उत्साह वाढवणारा सण म्हणजे गणपतीचा. गणपती कसे वाजत-गाजत येतात. त्यानंतर दहा दिवसांमध्ये होणारी गणपतीची पूजा, नैवेद्य, ढोल-ताशांचा गजर आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावरील व गणपती विसर्जनापर्यंतचे सर्व भाव या एका इलेस्ट्रेशनमध्ये मांडले आहेत.