तरुणाईचे कल्पनाविश्व शाळेच्या भिंतीवर!

school-wall
school-wall

नागठाणे - तरुणाई म्हणजे कल्पनांची भरारी. या तरुणाईला सुयोग्य मार्गदर्शनाचे पाठबळ लाभले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. त्याचीच प्रचीती देताना एकत्र येत युवकांनी आपले कल्पनाविश्व रंगरेषांच्या रुपात रामनगर शाळेच्या भिंतीवर उमटविले.

रामनगर ही सातारा शहरालगतची प्राथमिक शाळा. सातवीपर्यंतच्या या शाळेत रामनगरसह पानमळेवाडीचे विद्यार्थी शिकतात. विविध प्रकारच्या समस्या असूनही त्यावर मात करत शाळेने उपक्रमशीलता जपली आहे.

अलीकडेच इथले शिक्षणप्रेमी ग्रामस्थ अन् अमृत एकता मंडळाचे युवक एकत्र आले. त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सारा परिसर स्वच्छ केला. संरक्षक भिंत पूर्णपणे रंगविली.अशातच या भिंतीवर वैविध्यपूर्ण चित्रे काढण्याची कल्पना पुढे आली. युवकांनी ती उचलून धरली. त्यासाठी अरविंद गवळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तसेच गावातील युवकांनी पुढाकार घेतला. पुण्याच्या 'साँस फाउंडेशन'च्या वतीने सत्यशील शिंदे यांनी या संकल्पनेसाठी मार्गदर्शन केले. या वेळी पुण्यातील चित्रकार अनिकेत जऱ्हाड, वैभव ठाकरे हेही उपस्थित होते. या सर्वांनी भिंतीवर त-हेत-हेची चित्रे रेखाटली. त्यात छानपैकी रंग भरले. शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरणविषयक आशयाने त्यात खराखुरा अर्थ भरला. या चित्रांमुळे एरवी रुक्ष ठरणाऱ्या भिंती ख-या अर्थाने जीवंत अन् बोलक्या भासू लागल्या. शाळेच्या परिसरातील ही बदलेली चित्रांची दुनिया पाहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. 

याकामी मुख्याध्यापिका सुरेखा शिंदे, रेखा शेलार, श्रीकांत माने, दत्तात्रय कोरडे, अर्चना कोळसुरे या शिक्षकांनी परिश्रम घेतले. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे तसेच ग्रामस्थांनी या आगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.

ग्रामस्थ अन् शिक्षकांच्या प्रयत्नाला युवकांची साथ लाभली. त्यातून संरक्षक भिंतीचा जणू कायापालट झाला. या बोलक्या भिंती मुलांसाठी आकर्षणस्थान बनत आहेत.
- दत्तात्रय कोरडे (शिक्षक, रामनगर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com