कोल्हापूर जिल्ह्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा पर्दाफाश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

कोवाड - येथील बाजारपेठेत व्यापाऱ्यांना अन्न भेसळ अधिकारी असल्याचे सांगून दुकानांच्या तपासणीच्या नावाखाली पैसे वसूल करणाऱ्या तोतयांना व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तोतयांचा पर्दाफाश झाला. दुपारी चार वाजता कोवाडसह नेसरी येथील व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

कोवाड - येथील बाजारपेठेत व्यापाऱ्यांना अन्न भेसळ अधिकारी असल्याचे सांगून दुकानांच्या तपासणीच्या नावाखाली पैसे वसूल करणाऱ्या तोतयांना व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. व्यापाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तोतयांचा पर्दाफाश झाला. कोवाडसह नेसरी येथील व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

नेसरी येथील बेकरी व्यापारी सल्लाउद्दीन वाटंगी यांनी पोलिसांत राजू बाळाराम मुंढे, प्रभाकर हणमंत मुंढे (खरोशी, ता. चिक्‍कोडी), रमेश राजमनी बिंद, नदीम नसरुद्दीन नाईकवाडी, दिनेश रमेश बिंद (चिक्कोडी) यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. यातील तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर दोघे पळून गेले आहेत.

वाटंगी यांनी तक्रारीत असे म्हटले आहे, की दुपारी मोटार (एमएच ०९ एबी १२७२) मधून अनोळखी पाच व्यक्ती दुकानात आल्या.  त्यांनी आपण कोल्हापूर येथील अन्न भेसळ विभागातून आल्याचे सांगून दुकानाची तपासणी करणार असल्याचे सांगितले. दुकानाची तपासणी करताना दुकान स्वच्छ नसल्याचे कारण पुढे करून त्यांच्याकडून २० हजारांची मागणी केली. पैसे नसल्याने वाटंगी यांनी त्याला नकार दिला. त्यावर दहा हजार देऊन मिटवून टाका, असे सांगितले. त्यामुळे वाटंगी यांनी घाबरून त्यांना चार हजार रुपये दिले. पैसे मिळाल्याची वहीत नोंद करून इथून पुढे असेच सहकार्य केल्यास आपणही सहकार्य करू, असे सांगून ते निघून गेले. 

दरम्यान, कोवाड येथे अशाच पध्दतीने एका हॉटेल व एका बेकरीत दुकानदारांकडून पैशाची मागणी केली. तेव्हा व्यापाऱ्यांना संशय आला. त्यामुळे तत्काळ पोलिसांना याची माहिती देऊन त्यांची चौकशी करायला सांगितले. पोलिसांच्या माहितीत हे तोतया असल्याचे पुढे आल्यानंतर त्यांनी नेसरी येथेही वाटंगी यांच्यासह आणखी तीन व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने वाटंगी यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. दुकानातून दमदाटी करुन पैसे घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याने रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Impersonation food adulteration officers exposed in Kolhapur district