पेपर फुटू नये म्हणून बोर्डाने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

- बारावी प्रश्‍नपत्रिकांचे असतील 25 चे गठ्ठे 
- मुख्याध्यापकांची सोलापुरात झाली सहविचार सभा 
- शिक्षकांचा भत्ता त्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार 

सोलापूर : दहावी - बारावीच्या परीक्षेसाठी एका वर्गात 25 विद्यार्थी असतात. त्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी प्रश्‍नपत्रिकांचे 25 चे गठ्ठे तयार करून देण्यात येणार आहेत. कोणत्याही प्रकारे परीक्षेपूर्वी पेपर फुटू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे (बोर्डाने) ही काळजी घेतली आहे.  

राष्ट्रवादीचे नऊ आमदार माझ्या संपर्कात ः रणजितसिंह नाईक निंबाळकर 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विभागीय शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने दहावी - बारावीच्या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भात बुधवारी येथील मुळे हॉल येथे मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. त्या सभेसाठी विभागीय सचिव बबन दहिफळे, सहसचिव संगीता शिंदे, कक्ष अधिकारी राजेश जावीर, विस्तार अधिकारी अशोक भांजे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने उपस्थित होते. 

कावळ्यांना फरसाण अन्‌ चिवड्याचा नास्ता 

श्री. दहिफळे म्हणाले, ""परीक्षेचे ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये चूक करू नये. शेवटच्या क्षणी ऑनलाइन अर्ज भरणे टाळा. कारण शेवटच्या क्षणी संकेतस्थळावर अतिरिक्त भार पडल्याने त्यामध्ये तांत्रिक बिघाड होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. लाइट केल्यास पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. परीक्षा केंद्रावर एखाद्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेचे पान फाडल्यास किंवा कोरी पाने असल्यामुळे ते फाडून नेल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याला पुढील दोन वर्ष परीक्षेला बसता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सहसचिव शिंदे म्हणाल्या, बोर्डाकडे प्रत्येक शाळेने 10 ऑगस्टपूर्वी नोंदणी करणे अपेक्षित असते. शिक्षण संक्रमण मासिकाची वर्गणी भरून ते सुरू करावे. गुणपडताळणीसाठीचा प्रस्ताव शाळांनी पाठवावा. बोर्डाचा कायम संकेतांक त्वरित घ्यावा. अनेक शाळा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. शिक्षकांचा भत्ता त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला जाणार असल्याने अचूक खाते नंबर देणे आवश्‍यक आहे. यावेळी शाळांचे प्रोफाइल तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. संघाचे अध्यक्ष माने यांनी शिक्षण संक्रमणाची सक्ती माध्यमिक शाळेला जोडून उच्च माध्यमिक शाळा असेल तर त्याला करू नये अशी मागणी केली. 
 
परीक्षा फी जादा  घेतल्याच्या तक्रारी
बोर्डाने दहावी-बारावी परीक्षेसाठी यंदाच्या वर्षी परीक्षा फी वाढविली आहे. पण, शाळा विद्यार्थ्यांकडून जादा फी आकारणी करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्याबाबत मुख्याध्यापकांनी दक्षता घेण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An important decision of Ssc, Hsc board