मनपाच्या शाळांचा दर्जा सुधारा - आयुक्त डॉ. चौधरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या शाळांना इमारतींसह अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करेल. मात्र, या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवण्याची जबाबदारी तेथे काम करणाऱ्या शिक्षकांची आहे. खासगी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आज केले. रविवार पेठेतील चांदणी चौक येथील महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार राजेश क्षीरसागर होते. पुण्याचे खासदार संजय काकडे यांच्या निधीतून त्यांनी या शाळेच्या इमारतीसाठी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आज सायंकाळी नूतन इमारतीचे भूमिपूजन आयुक्त चौधरी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘महापालिकेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा आहे. चांगल्या इमारतींबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. नव्या इमारतीमुळे निश्‍चितच फायदा होईल. प्रशासन आवश्‍यक त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग, बागबगीचा, मैदाने यांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध व्हायचा असेल तर उत्पन्न वाढवण्याचा नूतन आयुक्त चौधरी यांनी प्रयत्न करावा. या भागात ओपन जीमसाठी आपल्या निधीतून दहा लाखाचा निधी दिला आहे. लवकरच या जीमचे उद्‌घाटन करण्याचा प्रयत्न करा. 

नगरसेविका निलोफर आजगेकर यांनी प्रभागातील समस्या मांडून धान्य बाजार अन्यत्र हलवण्याची मागणी केली. स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांनीही मनोगत व्यक्त केले. ललित गांधी यांनी शाळेला पूर्ण मदत करण्याचे आश्‍वासन दिले. गणी आजरेकर यांनी आभार मानले. 

 उपमहापौर अर्जुन माने, शारंगधर देशमुख, राजेश लाटकर, नगरसेविका वहिदा सौदागर यांच्यासह नगरसेवक पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Improve the quality of municipal schools