esakal | सांगलीत लसीकरण मोहिमेला ब्रेक; लस संपल्यानं केंद्र बंद

बोलून बातमी शोधा

Corona vaccinations

जिल्ह्यात दुपारनंतर लसींचे डोसच नसल्याने ठणठणाट होता. रात्रीपर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या लसीकरणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

सांगलीत लसीकरण मोहिमेला ब्रेक; लस संपल्यानं केंद्र बंद
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील कोरोना लसींचा साठा संपला. दुपारनंतर पासून 227 केंद्रावरील लसीकरण ठप्प झाले. सुमारे 150 लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने लोकांना माघारी फिरावे लागले. लस उपलब्ध असलेल्या ठिकाणी दिवसभरात केवळ साडेपाच हजार जणांचे लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

जिल्ह्यात दुपारनंतर लसींचे डोसच नसल्याने ठणठणाट होता. रात्रीपर्यंत लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या लसीकरणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आजअखेर 5 लाख 36 हजार 81 जणांचे लसीकरण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढाई सुरु आहे. सर्वच तालुक्‍यामध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे.

सध्या 45 वर्षावरील सर्वांनाच लस दिली जात आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला होता. आतापर्यंत जिल्ह्याला सुमारे 11 वेळा लस मागवावी लागली आहे. लस उपलब्ध असतानाच आरोग्य विभागाकडून मागणी कळवली जात आहे. मात्र लसींचा पुरवठा तुलनेत होत नाही. मंगळवारी दुपारी लससाठा संपला. जेवढी उपलब्ध होती, तेवढी लस देण्यात आली, मात्र एक वाजता जिल्ह्यातील 227 लसीकरण केंद्रावर ठणठणाट होता. मागणी करुनही लस उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण ठप्प झाले. लस शिल्लक असलेल्या केंद्रावर काही प्रमाणात लसीकरण झाले.

दिवसभरात फक्त 5 हजार 500 इतकेच लसीकरण झाले. जिल्ह्यातील 228 पैकी शंभर ठिकाणी केंद्रावरच लसीकरण सुरू होते. उर्वरित सर्व केंद्रे बंद होती. लस नसल्याने अनेकांना विना लसीचे माघारी परतावे लागले. केंद्र सरकारकडून राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यासाठी पुरेसा लसींचा साठा उपलब्ध नाही. जिल्हा आरोग्य विभागाने शासनाकडे लस मागणीबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे. पण शासनाकडून लस नाही. लस आल्यानंतर पाठवतो, असे जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले. दिवसभर लसीकरण अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांकडून लसीबाबत पाठपुरावा सुरु होता. मात्र शासनाच्या आरोग्य विभागाकडे लसींचे डोस मिळाले नसल्याने पाठवता येत नसल्याचे सांगण्यात आले.

" लस संपल्याने 5 हजार 550 लोकांना लस दिल्यानंतर थांबावे लागले. राज्य सरकारकडे पाठपुरावा सातत्याने सुरु आहे. मात्र लसच उपलब्ध नसल्याने लोकांची गैरसोय आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजनही कोलमडते आहे."

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.