निपाणी येथील घटना : शेळ्यांना वाचविताना पिता-पुत्रावर काळाने घातला घाला

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 15 August 2020

शेळ्या चारण्यासाठी शिवाजी आणि मारुती दोघेही राष्ट्रीय महामार्ग जवळील परिसरात गेले होते.  

 निपाणी (बेळगाव) : तुटून पडलेल्या विद्युतभारित वाहिनीला स्पर्श झाल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला. तसेच दोन शेळ्या देखील दगावल्याची घटना निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग जवळील वाळवे मळ्याजवळ शुक्रवारी ( १४) घडली. शिवाजी नाईक (वय ६०) व मारुती नाईक ( वय ३५, दोघेही रा. रामनगर, निपाणी) असे दुर्दैवी पिता-पुत्रांची नावे आहेत. या घटनेमुळे निपाणी शहर आणि रामनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती :

 नाईक कुटुंबीय गेल्या ५० वर्षापासून रामनगर येथे वास्तव्यास आहेत. बेरड समाजातील हे कुटुंब शेळ्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळील २५ शेळ्या घेऊन ते शुक्रवारी (ता. १४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेळ्या चारण्यासाठी शिवाजी आणि मारुती दोघेही राष्ट्रीय महामार्ग जवळील परिसरात गेले होते. सायंकाळच्या सुमारास शेळ्या चरत असताना दोन शेळ्या तुटून पडलेल्या विद्युतभारित वाहिनीस स्पर्श झाल्यामुळे मृत पावल्या. त्यांना वाचवण्यासाठी पिता-पुत्र गेलेल असता दोघांनाही विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा- काजू उद्योगाला स्टेट जीएसटीचा मिळणार परतावा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्‍याला होणार लाभ -

मात्र सायंकाळ होताच सर्व शेळ्या नाईक कुटुंबीयांच्या घराकडे गेल्या. यावेळी शिवाजी आणि मारुती न आल्याने कुटुंबीयांनी रामनगर शेजारी असलेल्या दौलत मळ्यातील सामाजिक कार्यकर्ते निकु पाटील यांच्याकडे जाऊन मारुती आणि शिवाजी न आल्याचे सांगितले.यावेळी दौलतराव पाटील फाऊंडेशनचे संस्थापक निकु पाटील आणि कार्यकर्त्यांनी या दोघांचा शोध सुरू केला.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग जवळील वाळवे मळ्याशेजारी दोघांचे मृतदेह आणि दोन शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. त्यामुळे तात्काळ या कार्यकर्त्यांनी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार रात्री नऊ वाजता बसवेश्वर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बनहट्टी आणि सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरा बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. मयत शिवाजी यांच्या मागे पत्नी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा-ऑनलाइन शाळा सॉफ्टवेअरचे कागलमध्ये अनावरण - ​

गरीब कुटुंबावर घाला

रामनगरातील नाईक कुटुंबीय शेळ्या चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पण अचानकच हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे पिता-पुत्रांना आपला जीव गमवावा लागला. निपाणी शहर आणि उपनगरात वारंवार अशा घटना घडत असल्याने शहरवासींयातून भीतीचे वातावरण पसरले आहे.