हसन मुश्रीफ यांच्या घर, कारखान्यांवर छापे

हसन मुश्रीफ यांच्या घर, कारखान्यांवर छापे

कागल - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील दोन, कोल्हापुरातील निवासस्थानासह सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज कारखाना, त्यांचे पुत्र साजिद यांचे पुण्यातील निवासस्थान व त्यांचे साडू गुलामहुसेन पटेल यांचे टाकाळा परिसरातील घर अशा सात ते आठ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने आज एकाच वेळी छापा टाकला. कारवाईत आक्षेप असलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली.

या कारवाईने जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. कारवाईची माहिती वाऱ्यासारखी कागलसह जिल्ह्यात पसरताच कागलमधील कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी गर्दी केली. महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाबरोबरच श्री. मुश्रीफ यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. काही महिलांनी त्यांच्या घरासमोर ठाण मांडले. काही काळासाठी कागलमधील व्यवहारही बंद होते. 

श्री. मुश्रीफ मुंबईहून आज सकाळी कोल्हापुरात आले. सकाळी पावणेआठच्या दरम्यान कागल निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर काही क्षणांतच पाच-सहा मोटारींमधून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. श्री. मुश्रीफ यांच्याकडे काम घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होती. अचानक झालेल्या कारवाईने कार्यकर्तेही हबकून गेले. या कार्यकर्त्यांना बाहेर काढून अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. सुरवातीला ज्या मोटारीमधून मुश्रीफ घरापर्यंत आले, त्या मोटारीची काही अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली. 

कागल येथील नव्या निवासस्थानासह याच परिसरातील जुन्या घरातही छापा टाकण्यात आला. त्याचवेळी त्यांचे कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील निवासस्थान, सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना, गडहिंग्लज येथील साखर कारखाना, त्यांचे पुत्र साजिद यांच्या कोंढवा (पुणे) येथील घर व त्यांचे साडू गुलामहुसेन पटेल यांचे टाकाळा परिसरातील स्वप्नील अपार्टमेंटमधील घर अशा सात ठिकाणी एकाच वेळी कारवाई सुरू झाली. कारवाईत प्राप्तिकरचे किमान २०० ते १५० अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले. यामध्ये श्री. मुश्रीफ यांच्याकडे त्यांनी केलेल्या व्यवहारांची माहिती घेऊन विविध कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरवात केली. दिवसभर ही कारवाई सुरू होती. यामध्ये काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली आहेत. कंपनी आणि त्यांच्या शेअर्सच्या अनुषंगाने ही कागदपत्रे असल्याचे समजते. याविषयी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

कारवाईची माहिती समजल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. दुपारी बाराच्या सुमारास काही महिलाही घोळक्‍याने त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचल्या. संतप्त कार्यकर्त्यांना जिल्हा बॅंकेचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने, बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, गणपतराव फराकटे आदींनी शांत करून पांगवले. 

दरम्यान, टाकाळा परिसरातील माळी कॉलनीतील आमदार हसन मुश्रीफ यांच्या साडूंच्या फ्लॅटवरही प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापा टाकला. गुलाम हुसेन पटेल असे त्यांचे नाव आहे. टाकाळा खणीशेजारील दिगे हॉस्पिटलजवळ ‘स्वप्नील’ अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये त्यांचा फ्लॅट आहे. दुपारनंतर तेथे कोणीही अधिकारी नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

ब्रिस्क कंपनीचीही तपासणी
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्त्वावर चालविण्यासाठी घेतलेल्या ब्रिस्क फॅसिलिटीज प्रा. लि. (शुगर डिव्हिजन) कंपनीचीही प्राप्तिकर विभागाने आज तपासणी केली. 

आर्थिक अडचणीतील गडहिंग्लज साखर कारखाना चार वर्षांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पुण्याच्या ब्रिस्क कंपनीला चालवण्यासाठी दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच प्राप्तिकर विभागाचे सुमारे पंधरा जणांचे पथक दोन वाहनांमधून सकाळी साडेसातलाच गडहिंग्लज कारखान्यावर दाखल झाले. दिवसभर कंपनी व त्यांच्या संचालकांसंदर्भात विचारपूस करण्यात आली. कारखान्याच्या सर्व विभागांतील कागदपत्रांची पाहणी केली. सायंकाळी उशिरा कारखाना व कंपनीच्या प्रतिनिधींचा जवाब घेण्यासह कंपनी व कारखान्यामध्ये झालेल्या कराराचीही तपासणी केल्याचे समजते. साखर कारखान्यावरील छाप्याची दिवसभर तालुक्‍यात चर्चा सुरू होती.

सरकारी यंत्रणेला सहकार्य करा
कारवाईनंतर दिवसभर कागल नगर परिषद, कागल बसस्थानक, गैबी चौक आणि मुश्रीफ यांच्या निवासस्थान परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. पोलिसांच्या फौजफाट्याला गर्दी आवरता येईना. त्यावेळी वारंवार श्री. मुश्रीफ घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना ‘तुम्ही निघून जा आणि सरकारी यंत्रणेला सहकार्य करा,’ अशी विनंती करीत होते. 

देणगी पावत्या आणि पत्रांचा ढीग...
मुश्रीफ यांच्या घरातच स्वीय साहाय्यक उदय पाटील यांचे कपाट आहे. त्यामधील कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी जप्त केली. देणगी पावत्या व रुग्णांसाठी विविध दवाखाना दिलेल्या पत्रांचा त्यात समावेश आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com