इथं पाणी पण मिळत नाही

Inconvenience at Rahuri bus station
Inconvenience at Rahuri bus station

राहुरी : शहरातील बसस्थानकातील जलकुंभाला गळती लागल्याने वर्षभरापासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. सहा महिन्यांपासून उपाहारगृह बंद आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक- वाहकांना चहा-नाश्‍ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्थानकात उतरलेल्या प्रवाशांना या उणिवा ठळकपणे जाणवतात. उपाहारगृहाचे भाडे बंद झाल्याने एसटी महामंडळालाही आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले बसस्थानक गैरसोयीचा अड्डा बनले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

प्रवाशांना गैरसोयीचा फटका 
जागतिक कीर्तीच्या शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानांच्या मध्यवर्ती ठिकाणी येथील बसस्थानक आहे. शिर्डीनंतर सर्वाधिक 525 बस येथे रोज ये-जा करतात. सुमारे 25 हजार प्रवासी येथून रोज प्रवास करतात. त्यांपैकी पाच हजार प्रवासी रोज स्थानकात उतरतात. तहानलेली लहान मुले, वृद्ध, महिला प्रवाशांना स्थानकातील गैरसोयींचा फटका खऱ्या अर्थाने जाणवतो. 

जलकुंभ बंद 
स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी जलकुंभ आहे. त्याला तोट्या बसविल्या आहेत; परंतु जलकुंभाला गळती लागल्याने वर्षभरापासून त्यात पाणी साठविले जात नाही. जलकुंभाचे नळ पाण्याअभावी बंद आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी दीड हजार चौरस फुटांचे उपाहारगृह आहे; परंतु करार संपल्याने एक एप्रिलपासून ते बंद आहे. एसटी महामंडळाला त्याचे दरमहा 70 हजार रुपये भाडे मिळत होते. आठ महिन्यांपासून उपाहारगृह बंद असल्याने, एसटी महामंडळाला तब्बल पाच लाख 60 हजार रुपयांचा फटका बसला. 

एसटीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 
एके काळी राहुरी बसस्थानकातील उपाहारगृह चोखंदळ ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. बसमधील प्रवासीच नव्हे, तर शहरातील ग्राहकही येथील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असत. उपाहारगृहाचे भाडे अवाच्या सवा वाढल्याने खाद्यपदार्थांचे दर वाढले. मात्र, दर्जा खालावला. उपाहारगृहाची ई-निविदा काढून, भाडे कमी करून, खाद्यपदार्थांचा दर्जा व दर निश्‍चित केल्यास या उपाहारगृहाला पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. सद्यःस्थितीत एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने, राहुरी बसस्थानक गैरसोयींचा अड्डा बनले आहे. 

स्थानकप्रमुखांना सूचना दिल्या 
राहुरी बसस्थानकातील उपाहारगृहाचा करार संपला आहे. उपाहारगृहाची ई-निविदा काढण्यासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाला (मुंबई) कळविले आहे; परंतु अद्याप ई-निविदा निघालेली नाही. त्यामुळे उपाहारगृह बंद आहे. प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी स्थानकप्रमुखांना सूचना देऊ. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर 
 

पाणपोई सुरू करावी 
एसटी महामंडळाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही तर स्वयंसेवी संस्थांना पाणीपोई सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. उपहारगृहही लवकरात लवकर सुरू करावे. 
- मिठ्ठूलाल शर्मा, स्वातंत्र्य सैनिक, राहुरी  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com