दुधाच्या खरेदी-विक्री दरात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सोलापूर - सरकारने राज्यातील गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदी व विक्री दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. याची अंमलबजावणी 21 एप्रिलपासून केली जाणार आहे. 

सोलापूर - सरकारने राज्यातील गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदी व विक्री दरामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. याची अंमलबजावणी 21 एप्रिलपासून केली जाणार आहे. 

सरकारच्या वतीने यापूर्वी एक जुलै 2016 मध्ये दुधाच्या खरेदी दरामध्ये दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी गाईच्या दुधाचा खरेदी दर 20 रुपयांवरून 22 रुपये केला होता. त्यानंतर दहा महिन्यांनी सरकारने पुन्हा खरेदी व विक्री दरामध्ये दोन रुपये वाढीचा निर्णय घेतला आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रत असलेल्या गाईच्या दुधाला यापूर्वी सरकारचा दर 22 रुपये प्रतिलिटर होता. तो आता 24 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचबरोबर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ गुणप्रत असलेल्या म्हशीच्या दुधाला 31 वरून 33 रुपये प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

खरेदी दराप्रमाणे विक्री दरामध्येही दोन रुपये वाढीचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना सरकारी योजनेतून गाईचे दूध खरेदी करायचे झाल्यास एका लिटरला आता 37 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हा दर 35 रुपये प्रतिलिटर इतका होता, तर म्हशीच्या एक लिटर दुधाची खरेदी करायची झाल्यास 44 रुपयांऐवजी 46 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. 

सहकारी व खासगी संघामध्ये चढाओढ 
राज्यात दुधाचे उत्पादन कमी होऊ लागले आहे. त्यामुळे दूध मिळविण्यासाठी सहकारी व खासगी दूध संघामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातूनच दूध उत्पादकांना चांगला दर मिळू लागला आहे. सहकारी व खासगी संघामार्फत गाईच्या एका लिटर दुधासाठी 26 रुपये उत्पादकांना दिले जात आहेत. त्यामुळे सरकारी दरापेक्षा हा दर दोन रुपयांची जास्त आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय म्हणजे "वरातीमागून घोडे' असाच आहे.

Web Title: Increase in buy-sell milk