शेजारील विजापूरमुळे जतला वाढला धोका 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कर्नाटकातील विजापूर मध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर सहा रुग्ण आढळल्याने जत तालुक्‍यात याचा धोका वाढला आहे.

जत : तालुक्‍याच्या सीमा लगतच असलेल्या कर्नाटकातील विजापूर मध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू तर सहा रुग्ण आढळल्याने जत तालुक्‍यात याचा धोका वाढला आहे. याचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. तालुक्‍यातील पंचाहत्तर टक्के अत्यावश्‍यक वस्तूसह इतर व्यवहार हे विजापूर येथून होतात. त्यामुळे जत तालुक्‍यात भीतीचे सावट आहे. जिल्हासह तालुका प्रशासनाने कर्नाटकात जाणारे सर्व रस्ते पूर्णपणे सील केले आहेत.

इस्लामपूर येथील 26 पैकी 25 रुग्ण निगेटिव्ह आले. त्यामुळे सांगली जिल्ह्यात समाधान व्यक्त होत असताना जतच्या सीमा भागापासून अवघ्या 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या विजापूर मध्ये कोरोनाचा नवे रुग्ण वाढल्याने जिच्या ग्रामीण भागात भीतीचे सावट मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. तालुक्‍यात आज अखेर 25 जण परदेशातून जतमध्ये दाखल झाले असून यापैकी 23 जणांचा होम कॉरंटाईनचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अद्याप दोघांचा पूर्ण होणे बाकी आहे. तर संचारबंदीचा कार्यकाळ ता.3 मे पर्यंत केल्याने तालुक्‍यात मुंबई व पुण्याहून येणारे लोंढे वाढलेले आहेत. आजच्या घडीला 114 जणांना आरोग्य विभागाने होम कॉरंटाईन केले आहेत. मात्र, यामध्ये एकालाही आरोग्याचा त्रास नाही. 

दरम्यान, जत तालुक्‍यात विजापूर येथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. जत पेक्षा विजापूरची बाजार पेठ जत पूर्व भागातील नागरिकांना जवळ आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी जत तालुक्‍यात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची माहिती घेतली. हे सर्व रस्ते पूर्णपणे सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जत व उमदी पोलिसांनी कर्नाटकात जाणारे सर्व रस्ते व पायवाट बंद करण्यात आले आहेत. 

कर्नाटकात जाणारे हे रस्ते बंद..... 
चडचण, देवरनिंबर्गी, हळ्ळोळी, सुसलाद, कोकणगाव, कोंतेव बोबलाद, गिरगाव, तिकोंडी, अक्कळवाडी, गुलगुंजनाळ, जालिहाळ बुद्रुक, कागणरी, धुळकरवाडी, बिळूर, सिंदूर, अनंतपूर, आदी रस्ते व पायवाटा सील करण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increased risk due to neighboring Bijapur to Jat- Sangali