Independence Day : वाढता वाढे जिलेबीची गोडी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सातारा - स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला जिलेबीच्या गोडीची जोड देणे ही साताऱ्याची खासियत. स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात टनावर जिलेबीची उलाढाल होते. या वर्षीही आनंद जिलेबीच्या पाकात मुरवूनच स्वातंत्र्यदिनाचा घेण्यास सातारकर सज्ज आहेत.

सातारा - स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला जिलेबीच्या गोडीची जोड देणे ही साताऱ्याची खासियत. स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात टनावर जिलेबीची उलाढाल होते. या वर्षीही आनंद जिलेबीच्या पाकात मुरवूनच स्वातंत्र्यदिनाचा घेण्यास सातारकर सज्ज आहेत.

प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनाच्या आनंदाला साजूक तुपातील गोड जिलेबीची जोड देऊन आनंद द्विगुणित करण्याची थेट १९४७ पासूनची परंपरा सातारकर आजही जपत आहेत. साताऱ्यात ही प्रथा सुरू झाली अन्‌ आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर जिलेबी केली जाते. या कालावधीत जिलेबीच्या विक्रीत वाढच होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. साताऱ्यात राजवाड्यापासून उपनगरापर्यंत सर्वत्र जिलेबीचे खास स्टॉल उभारले आहेत. या दिवशी साताऱ्यात झोपडीपासून महालापर्यंत गरम जिलेबीचा आस्वाद अनेक जण घेत असतात. त्यामुळेच दिवसेंदिवस जिलेबीची विक्री आणि विक्रेते वाढत आहेत.  तिरंग्याला वंदन करून येताना प्रत्येकाच्या हातात असतो तो गरम जिलेबीचा पुडा. दुष्काळ असो नाही तर अतिवृष्टीचा तडाखा. सातारकरांचा स्वातंत्र्यदिन आणि जिलेबीचे नाते कधी पातळ झाले नाही. महाग आणि स्वस्त याचा येथील नागरिकांनी कधीच विचार केला नाही. पहाटेपासून जिलेबी करण्यास सुरवात होते. ती दिवसभर चालते. ग्राहकांना गरम- गरम जिलेबी मिळावी, यासाठी सर्वच मिठाई विक्रेते सजग असतात. जिल्ह्यातही छोट्या- मोठ्या शहरात आणि मोठ्या गावांतील हलवाईही स्वातंत्र्यदिनास मोठ्या प्रमाणावर जिलेबी तयार करतात.

जिलेबीचा दर (प्रति किलो रुपयांत)
रिफाईंड तेलातील जिलेबी -     १६० ते २००
तुपातील जिलेबी -     ३२० ते ४००

Web Title: Independence Day jilebi sailing sweet