त्याचा 'सलाम' त्याला 'हिरो' बनवून गेला.... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

दै. सकाळचे शिरवडे येथील बातमीदार अनिल घाडगे यांनी स्वातंत्र्यदिनी टिपलेले मनोरुग्णाचे ध्वजाला सलाम करतानाचे छायाचित्र संपूर्ण भारतात पोहोचले.

सातारा - स्वातंत्र्यदिनी झेंड्यास सलामी देणाऱ्या मनोरुग्णाने समाजाला देशभक्तीचा संदेश दिला. हे छायाचित्र टिपण्याचे भान मला मिळाले आणि हा मनोरुग्ण जगभर पोचला. छायाचित्राची वाहवा झाली. मात्र, या मनोरुग्णाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही धडपड झाली पाहिजे, ही वेदना अंतरंगात तळमळत आहे, याची जाणीव सातत्याने होत आहे, असे दै. सकाळचे शिरवडे येथील बातमीदार अनिल घाडगे यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिनी या व्यक्तीचे ध्वजाला सलाम करतानाचे छायाचित्र संपूर्ण भारतात पोहोचले. त्याचा 'सलाम' त्याला 'हिरो' करून गेला. 
Image may contain: 1 person, sitting and outdoor

श्री. घाडगे सांगत होते...कोरेगाव तालुका पंचायत समितीतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यावर डॉ. बलदेव निकम (रा. जांब बुद्रुक) यांच्यासह कोरेगाव रेल्वे स्टेशनला आलो. तेथे रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व नेहमीचे रिक्षाचालक सर्वजण ध्वजवंदनाच्या तयारीत होते. पुढे ध्वजवंदन चालू असताना मागे कायम स्मरणात राहणारा प्रसंग उभा आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. सफेद कपडे किंवा हातात झेंडा असे काहीच नसताना चप्पल काढून त्याने ध्वजाला सलामी दिली. ध्वजाला सलामी देणाऱ्या मळकट मनोरुग्णावर नजर जाताना काहीतरी वेगळे भावले आणि मी मोबाईल फोनने छायाचित्र टिपले. 
Image may contain: 3 people, people standing, shoes and outdoor

हा फोटो देशभर किंबहुना जगासाठी प्रेरणादायी ठरला. फक्त वेगळा फोटो समजून मी फोटो सगळ्यांना पाठविला. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र होता. त्यानेच आज एक विदारक सत्य समोर आले. फोटो संदेशासह सर्वत्र पाठविला. सोशल मीडियावर फोटोचे श्रेय घेण्यासाठी अनेकजण सरसावले. सांगलीच्या डॉ. तुकाराम साळुंखे यांनी तसेच कित्येकांनी हा फोटो DP ठेवल्याचे सांगितले. महाराष्ट्रातून अनेकजणांचे, संस्थांचे, समाजातील जागरूक व्यक्तींचे फोन आले. परदेशातही फोटो पोहोचल्याचे निरोप आले. एवढ्या सगळ्या नवख्या प्रसंगाने मन सुन्न झाले होते आणि नजर त्या व्यक्तीला शोधत होती. सकाळच्या (ता. 17) अंकात हा फोटो माझ्या नावासह झळकला. एका फोटोने ओळख वाढविली व सन्मान दिला. आणि अजून नियतीच्या मनात काही असावं तसं घडलं.

Image may contain: 1 person, standing
राजेंद्र कुंभार, राजेंद्र थोरात व सतीश देशमुख (रा. शिरवडे स्टेशन) यांनी येथेच फोटोतील व्यक्ती पाहिली. त्यांनी वर्तमानपत्रात खात्री केली आणि तातडीने मला बोलाविले. प्रत्यक्ष तीच व्यक्ती समोर पुन्हा दिसली. त्याची मनस्थिती ठीक नव्हती. पण त्याच्या कलाने घेतल्याने तो बोलू लागला. बोलताबोलता त्याचे नाव संतोष लक्ष्मण माने हा तासगाव (जि. सांगली) या परिसरातील असल्याचे समजले. त्याचे आई-वडिल वारले. भावाच्या मृत्यूनंतर त्याची मनस्थिती बिघडली. त्याच्या पिशवीत ग्रीसचा डबा व कपडेही काहीसे तेलकट असल्याचे दिसले. मोहसिन संदे, बलदेव निकम, प्रथमेश वायदंडे व सुरज लोंढे यांनी चित्रीकरणासाठी मदत केली. दरम्यान, 108 वरून रुग्णवाहिका बोलावली, ती येऊनही मनोरुग्णांसाठी सेवा नसल्याचे सांगून परत निघून गेली. दोन तीन तास संतोष मानेसह असताना त्याची आक्रमकता वाढल्याचे जाणवले. नजर चुकवून तो निसटला. आणि पुढे काही करायचे होते ते राहून गेले. परंतु भारतमातेला केलेला सलाम माझ्या मनात पक्के घर करून राहिला होता. त्याच्या भेटीत त्याला मदतीची गरज असल्याचे जाणवत होते. त्यामुळे आता त्याला पुन्हा शोधतोय. त्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. या हातांना त्याची प्रतीक्षा असल्याची जाणीव मनात आहे.

Web Title: independence day viral photo