युरोपच्या डाळिंब बाजारावर यंदा भारताचे वर्चस्व

सुदर्शन सुतार
मंगळवार, 21 मार्च 2017

महाराष्ट्राचा 90 टक्के वाटा; 125 कंटेनरची निर्यात, पैकी 100 युरोपात

महाराष्ट्राचा 90 टक्के वाटा; 125 कंटेनरची निर्यात, पैकी 100 युरोपात
सोलापूर - दुष्काळाला गेल्या तीन वर्षांपासून तोंड देऊनही यंदा भारतातून डाळिंबाची 18 लाख 75 हजार किलो इतकी विक्रमी निर्यात झाली. त्यात सर्वाधिक युरोपच्या बाजारात सुमारे शंभर कंटनेरची (15 लाख किलो) निर्यात झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 90 टक्के आहे. तसेच, बाजारातील डाळिंबाचे दरही तेजीत राहिले. प्रतिकिलोला 135 ते 150 रुपयांपर्यंत दर मिळाला. युरोपीय देशांमध्ये पहिल्यांदाच भारतीय डाळिंबाला पसंती मिळाली आहे.

डाळिंबाच्या बाजाराने यंदा नोव्हेंबर- डिसेंबरपासूनच उसळी घेतली. अगदी स्थानिक बाजारातही डाळिंबाला प्रतिकिलो 60 ते 65 रुपयांपर्यंत दर मिळाला, तर निर्यातक्षम, "रेसिड्यू फ्री' डाळिंबाला युरोप बाजारात तब्बल 135 ते 150 रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या काही वर्षांत जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबाला युरोपीय देशांच्या तुलनेत बांगलादेश, नेदरलॅंड, रशियासह आखाती देशांत चांगली मागणी होती; पण यंदा युरोपनेच संपूर्ण बाजारपेठ काबीज केली. त्यामुळे या देशांना तुलनेने कमी निर्यात झाली.

फेबुवारीअखेर एकूण सुमारे 18 लाख 75 हजार किलोपर्यंतची डाळिंबाची निर्यात होऊ शकली, त्यापैकी 15 लाख किलो डाळिंबाची निर्यात एकट्या युरोपात झाली. त्यात निम्म्याहून अधिक वाटा एकट्या महाराष्ट्राचा राहिला. देशात डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी आहे; पण यंदा निर्यातीतही महाराष्ट्राने आघाडी घेतली. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडूमधूनही निर्यात झाली; पण ती अगदीच किरकोळ प्रमाणात झाली.

"भगव्या'ला सर्वाधिक पसंती
राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख हेक्‍टर इतके आहे, तर देशात दीड लाख हेक्‍टर इतके एकूण क्षेत्र आहे. राज्यात गणेश, मृदुला, आरक्ता आणि भगवा या वाणांच्या डाळिंबांचे उत्पादन घेतले जाते, त्यातही भगवा वाणाला निर्यातीत सर्वाधिक पसंती आहे. शिवाय, डाळिंबाचा आकार, वजन, रंग आणि चव या वैशिष्ट्यांमुळेच भारतीय डाळिंबाला मोठी मागणी आहे.

नैसर्गिक संकटावर मात
गेल्या काही वर्षांत "तेल्या' व "मर'सारख्या रोगांमुळे डाळिंबाची प्रत काहीशी खालावत चालल्याचे चित्र होते, त्यातच सलगच्या दुष्काळामुळेही प्रश्‍न निर्माण झाले; पण अलीकडच्या काही वर्षांत या रोगाला प्रतिकार करण्याची ताकद शेतकऱ्यांनी निर्माण केली आहे. नैसर्गिक संकटाला तोंड देऊनही उत्पादन आणि निर्यातीतील आघाडी त्यामुळेच महत्त्वाची मानली जाते.

Web Title: India dominated pomegranate market on europe