सनातन विचारांद्वारे भारत विश्वगुरू बनेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

""केवळ उपदेश महत्त्वाचा नसून, त्याचे आचरण महत्त्वाचे आहे. या आचरणात आपले मनच बाधा आणते. सामूहिक गीतापठणाचा हा उपक्रम अद्वितीय आहे. यातून घडलेली युवा पिढी देशाचे प्रतिनिधित्व करील,''

संगमनेर (नगर) ः ""समस्त मानवजातीला सद्‌वर्तनाचा उपदेश देणाऱ्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील सनातन विचारधारेच्या आधारावर भारत विश्वगुरू बनेल. फळाची अपेक्षा न करता काम केल्यास जीवनात यश मिळेल,'' असा विश्‍वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला. 

संगमनेरमध्ये गीता परिवाराच्या वतीने गीताजयंती व संस्थापक स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या 71व्या जन्मदिनानिमित्त श्रीमद्‌भगवद्‌गीतेतील 12 व 15व्या अध्यायाच्या पठणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

हेही वाचा ः दरोडेखोरांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

""केवळ उपदेश महत्त्वाचा नसून, त्याचे आचरण महत्त्वाचे आहे. या आचरणात आपले मनच बाधा आणते. सामूहिक गीतापठणाचा हा उपक्रम अद्वितीय आहे. यातून घडलेली युवा पिढी देशाचे प्रतिनिधित्व करील,'' असे भागवत म्हणाले. 

डॉ. संजय मालपाणी म्हणाले, ""33 वर्षांपूर्वी (स्व). ओंकारनाथ मालपाणी यांच्या स्फूर्तीतून लावलेल्या गीता परिवाराच्या रोपट्याचा विस्तार 17 राज्यांत झाला आहे. या माध्यमातून बालसंस्कारासाठी काम केले जाते.'' 

हेही वाचा ः एकाच अभियंत्यावर दिवाबत्तीचा भार 

गीता परिवाराचे संस्थापक गोविंददेवगिरी महाराज यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मालपाणी परिवारातील सदस्यांनी गौरव केला. "ध्रुव'च्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रात्यक्षिकांनी योगगुरू रामदेवबाबांना भुरळ घातली. 

35 हजार विद्यार्थ्यांचे सामूहिक गीता पठण 

या वेळी सुवर्णा मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गीतेतील 12 व 15व्या अध्यायाचे, आठ राज्यांतून आलेल्या 185 शाळांमधील सुमारे 35 हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक पठण करून विक्रम नोंदविला. लखनौ, पुणे, औरंगाबाद व नगर येथील भगवद्‌गीता मुखोद्‌गत केलेल्या 81 गीताव्रतींचा गौरव करण्यात आला. 
या वेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्‍याम जाजू, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, ललितादेवी, सुवर्णा, मनीष, गिरीश, राजेश मालपाणी आदी उपस्थित होते. 

कांद्याबाबत मोदी काय करतील? 

योगगुरू रामदेवबाबा म्हणाले, ""जगात दहशतवाद वाढत आहे. भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण झाले आहे. त्याला गीतेतील संस्कारच रोखू शकतात. काही जण पंतप्रधान मोदी यांना कांद्याच्या वाढत्या दराविषयी विचारतात. मात्र, मोदी कांद्याच्या दराबाबत काय करतील?''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India will become a world guru