मनात घर करून राहिलेला `तो` बंगला

Indian Amy General S P P Thorat Homes
Indian Amy General S P P Thorat Homes

कोल्हापूर ः ताराबाई पार्कातला हा बंगला रायबहाद्दूर पी. सी. पाटील थोरात यांचा. हे पी. सी. पाटील म्हणजे, राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या शाहू मराठा बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी. ही झाली बंगल्याची एक ओळख. दुसरी ओळख म्हणजे हा बंगला त्यांचे चिरंजीव भारतीय लष्कराचे जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या वास्तव्याने आणखी चिरंतन झाला.

हे पण वाचा -  कामगार संघटना धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर 

ताराबाई पार्कचा मानबिंदू हा बंगला आहे. एका फ्रेंच वास्तुशिल्पकाराने रचना केलेला हा बंगला आज 79 वर्षे झाली पण तो जुना होण्याऐवजी दिवसागणीक आपले देखणेपण टिकवून आहे. 1940 च्या काळात ताराबाई पार्क वसला गेला. त्यावेळी एक-एक दोन-दोन एकर जागा घरांसाठी दिली गेली. डफळे, इंदूलकर, थोरात, भोसले, घोरपडे, केळवकर अशा दिग्गजांचे ऐसपैस बंगले उभे राहिले. थोरांताच्या या दोन एकराच्या बंगल्याचे नाव "इंदू' या इंदू म्हणजे पी. सी. पाटील यांच्या धाकट्या कन्या. त्या अकाली गेल्या आणि त्यांचे नाव बंगल्याला दिले गेले. पी. सी. पाटील थोरात यांना तीन मुले व दोन मुली. त्यातले शंकरराव उर्फ एस. पी. पी. हे भारतीय लष्कराचे जनरल. दिनकरराव हे डीआयजी आणि नारायणराव हे कर्नल आणि आनंदीबाई व इंदू या दोन मुली. अशा या कर्तुत्वसंपन्न लोकांचे घर त्याच तोलामोलाचे. आज ताराबाई पार्ककडे वळण घेतले की समोरच हा पहिला बंगला दिसतो. बंगल्याच्या आवारात फळा, फुलांची झाडे. एखाद्या जुन्या खोडावर किंवा दगडावर छोट्या, छोट्या शिल्पाकृती मांडलेल्या. बंगल्याला 20 खोल्या. पण सर्वत्र हवा खेळण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर चार मोठ्या खिडक्‍यांची रचना. या चार खिडक्‍या उघडल्या की पश्‍चिमेकडून येणारा वारा या खिडक्‍यातून बंगल्यात उतरतो आणि बंगल्यातल्या या खोलीतून त्या खोलीत झुळुझुळु वहात राहतो. त्यामुळे घराघरातला पंखा बहुतेक वेळा बंदच राहतो.

हे पण वाचा - कोल्हापूर-सांगली महामार्गावर चक्का जाम; राजू शेट्टींचा सरकारला इशारा 

घरात पी. सी. पाटील थोरात होते तेंव्हापासून माणसांची सतत वर्दळ. त्यांच्यानंतर जनरल एस. पी. पी. थोरात यांचे वास्तव्य सुरू झाले. ते व त्यांच्या पत्नी लिला यांनी बंगल्याच्या प्रांगणात झाडे लावली. एस. पी .पी थोरात म्हणजे लष्करप्रमूख, आणि त्यांचा बंगला लष्कराच्या करड्या शिस्तितच असेल असे सहाजिकच वाटेल. पण या बंगल्यात पु. ल. देशपांडे, भिमसेन जोशी, वसंत कानेटकर, वि. स. खांडेकर यांच्यासारख्या साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांचा फड या बंगल्यात रंगू लागला. 1992 साली एस. पी. पी. थोरात यांचे निधन झाले. आणि त्यांचे चिरंजीव रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर यशवंतराव व उषा थोरात यांचे वास्तव्य या बंगल्यात आहे. त्यानंतर या बंगल्यात चित्रकला, शिल्पकलेचा प्रवेश झाला. बंगल्याची प्रत्येक भिंत आणि कोपरा चित्रशिल्पांनी सजला. या बंगल्यात कोल्हापुरच्या समाजकारणानेही प्रवेश केला. अनेक सामाजिक, नागरी प्रश्‍नावर या बंगल्यात खल होऊ लागला. किंबहुना हा बंगला अलिकडच्या काळात दिशादर्शकाची भूमिका निभाऊ लागला. नटसम्राट चित्रपटाच्या निमित्ताने हा बंगला पडद्यावर आला. नटसम्राट गणपतराव बेळवलकरांचे घर या बंगल्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले. बंगल्याच्या फोटोचा हा एकमेव अपवाद वगळता हा बंगला आजअखेर फोटो ऐवजी कोल्हापुरकरांच्या मनात कायमचा भरून राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com