इंदिरा गांधींनी महाराष्ट्रातील "या' शहरात केली कोकण रेल्वेसह चार मार्गांची घोषणा

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पंडितजी-इंदिराजींनी घेतली
बरबड्याच्या भाकरीची चव

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता पंडित नेहरू यांनी 1952 मध्ये बरबड्याच्या भाकरीची चव स्वतः घेतली होती. सुमारे वीस-एकवीस वर्षांनी (1972-73) पुन्हा दुष्काळ पडला. त्या वेळी याच बरबड्याच्या भाकरीचे तुकडे मी श्रीमती गांधी यांना दिल्लीत नेऊन दिले. ते पाहिल्यावर इंदिराजींनी तब्बल दहा हजार टन धान्य महाराष्ट्रासाठी मंजूर केले. नेहरू (पिता) आणि मुलगी (इंदिराजी) या दोघांनीही सोलापुरातील बरबड्याच्या भाकरीची चव घेण्याचा योगायोग घडला.
- निर्मला ठोकळ, माजी आमदार

सोलापूर : दुष्काळी कामांतर्गत कोकण रेल्वेसह चार लोहमार्गांची घोषणा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूर जिल्ह्यातील आचेगाव या गावात 1972 ला केली. सभेनंतर त्यांनी आचेगाव येथील पाझर तलावाची पाहणी केली आणि सभेतील महिला व मुलींमध्ये मिसळून त्यांची विचारपूसही केली.... या आठवणी जागवल्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी. निमित्त आहे इंदिराजींच्या आजच्या (मंगळवार) 102 व्या जयंतीचे.

अहो आश्चर्यम... आम्हीच येऊ पुन्हा महापालिकेची सभा तहकूब

50 हजार नागरीकांची उपस्थिती
सोलापूर जिल्ह्यात 1972 मध्ये दुष्काळ पडला होता. त्या वेळी श्रीमती गांधी सोलापूर दौऱ्यावर आल्या होत्या. आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी त्यांची जाहीर सभा झाली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी. के. सावंत, महसूलमंत्री भाऊसाहेब वर्तक, संपर्कमंत्री शरद पवार त्यांच्या समवेत होते. सकाळी आठ वाजून 55 मिनिटांनी इंदिराजींचे आगमन झाले. त्यांच्या सभेसाठी जिल्हाभरातून 50 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. या सभेसाठी सोलापूर आणि अक्कलकोट येथून खास 75 एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. बैलगाड्यांत महिला व मुली, तर दुचाकींवरून पुरुष मंडळी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते. पहाटेपासूनच नागरिकांची सभास्थानी गर्दी झाली होती. सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विविध मागण्यांचे निवेदन श्रीमती गांधी यांना या वेळी दिले. दक्षिण सोलापूरचे तत्कालीन आमदार वि. गु. शिवदारे यांनी या सभेचे आयोजन केले होते.

ही बस करतेय कौशल्याचा जागर....

रेल्वेमार्गांची केली घोषणा
श्रीमती गांधींनी आपल्या भाषणाची सुरवात दुष्काळी स्थितीपासूनच केली. दुष्काळी स्थितीत लोकांना कामे मिळावीत यासाठी कोकण रेल्वेसह मनमाड ते मुखेड मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये नांदेडपर्यंत रूपांतरण करणे आणि लातूरचा लोहमार्ग सुरू करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी आनंदाने टाळ्या वाजवून स्वागत केले. व्यासपीठावर बसलेला प्रत्येकजण नागरिकांच्या आनंदामध्ये सहभागी झाला होता. सभेनंतर गांधी यांनी आचेगाव येथील पाझर तलावाची पाहणी केली. तेथील महिला व मुलींची विचारपूस केली. पाहणीनंतर त्या दिल्लीकडे रवाना झाल्या.

आवर्जून ऐका... महगाईबाबत काय म्हणाल्या इंदिराजी आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांची सोलापूरसंदर्भात इंदिराजींची आठवण (व्हिडीओ)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indira gandhi anaunced kokan railway project in solapur district