इंद्रा ढबू मिरची निर्यातबंदीमुळे संकटात

इंद्रा ढबू मिरची निर्यातबंदीमुळे संकटात

सांगली - पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानवर निर्यातबंदी लागू केल्याने शेतकऱ्यांना निर्यातीसाठी अन्य देशांकडे मोर्चा वळवावा लागला आहे. विशेषतः ढबू मिरचीसाठी आखाती  देशांकडे वळावे लागले आहे. 
इंद्रा जातीची मोठ्या आकाराची ढबू मिरची प्रामुख्याने पाकिस्तानला पाठवली जाते. तिला स्थानिक बाजारपेठेत विशेष मागणी नाही. शेतकऱ्यांना निर्यातीसाठी चांगला दरही मिळत होता. जिल्ह्यात शेकडो एकर क्षेत्रात या जातीची ढबू मिरची पिकवली जाते. ८०-९० दिवसांच्या या पिकाने शेतकऱ्यांना चांगला आर्थिक हात दिला आहे. पुलवामा घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर निर्यातबंदी  लागू केली; त्यामुळे ढबू मिरचीची निर्यात संकटात सापडली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाकिस्तान हाच मोठा ग्राहक होता. आता ही मिरची दिल्ली-मुंबईसोबत आखाती देशांत विकावी लागत आहे. तुलनेने दरही कमी मिळत आहे. इंद्रासोबत पिकवली जाणारी अन्य जातीची ढबू कोल्हापूर, जयसिंगपूर, पुणे बाजारपेठेत विकली जाते. कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो असा अन्य भाजीपालाही कोल्हापुरात खपतो; इंद्राला मात्र मागणी नसते. 

निर्यातबंदीची संधी स्थानिक एजंटांनी उठवली आहे. मागणी नसल्याचे कारण सांगत दरही कमी केले आहेत. दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये सीमा बंद केली जाते; त्यावेळीही इंद्रावर संकट येते. यंदा पुलवामामुळे मार्च-एप्रिलमध्येच निर्यात थंडावली आहे. १५० ग्रामहून अधिक वजनाच्या इंद्राला तेथे चांगली मागणी आहे. तीस रुपयांपेक्षा अधिक दर मिळतो. सध्या मिळेल त्या दराने द्यावी लागत आहे.

निर्यातबंदीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारने अनुदान स्वरूपात मदतीचा हात द्यायला हवा. अन्य  देशांत निर्यातीसाठी उत्तेजन आणि सवलती द्याव्यात.
- महादेव कोरे,
प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शेतकरी संघटना

इंद्रा ढबू मिरची शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळवून देते. भारत-पाकिस्तानात तणाव निर्माण होतो तेव्हा निर्यात संकटात येते. यंदाही इंद्रा उत्पादकांना बंदीचा सामना करावा लागतोय.
- नाथाजी पाटील,
शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com