कोल्हापूरची उद्योजकता हेच खरे नेतृत्व - गिरीश चितळे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - उद्यमशील कोल्हापूरकरांनी नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा ध्यास जपला. येथील उद्योजकांनी कोल्हापूरचे नाव जगभरात नेले. इथली उद्योजकता हेच जिल्ह्याचे खरे नेतृत्व असल्याचे गौरवोद्‌गार चितळे उद्योगसमूहाचे संचालक गिरीश चितळे यांनी काढले. येथील सॅटर्डे क्‍लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित उद्योगरत्न पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते. घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष किरण पाटील यांचा या पुरस्काराने गौरव झाला. क्‍लबचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अशोक दुगाडे अध्यक्षस्थानी होते.

दरम्यान, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला. श्री. पाटील आणि क्‍लबचे विश्‍वस्त प्रदीप ताम्हाणे यांच्यात या वेळी मुक्त संवाद रंगला. येथील उद्योजकतेतील विविध प्रवाह, नवे तंत्रज्ञान, नव्या संकल्पना आणि भविष्यातील संधी अशा विविध अनुषंगाने यानिमित्त मंथन झाले. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ असा निर्धारही या वेळी झाला. 
महापौर शोभा बोंद्रे यांनीही येथील उद्योजकतेचा गौरव केला. येथील उद्योजकांच्या नवसंकल्पनांमुळेच औद्योगिक विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मधुरिमाराजे छत्रपती म्हणाल्या, ‘‘उद्योजक किरण पाटील हे नेहमीच आयडॉल राहिले आहेत. त्यांचा सन्मान हा संपूर्ण उद्योगविश्‍वाचा सन्मान आहे.’’ 

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, ‘‘येथील उद्योजक प्रसिद्धीपासून अलिप्त राहून जगतिक पातळीवरील काम करीत आहेत.’’ सॅटर्डे क्‍लब ग्लोबल ट्रस्टचे सचिव नरेंद्र बगाडे यांनी क्‍लबच्या एकूणच कामाची माहिती दिली. युनियन बॅंकेचे सरव्यवस्थापक एच. सी. मित्तल यांनीही मनोगत व्यक्त केले. दिशा पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. किरण खोत यांनी मुक्तसंवाद खुलविला.

क्‍लबचे विभागीय सचिव श्रीकृष्ण पाटील, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील, योगेश कुलकर्णी, ‘गोशिमा’चे अध्यक्ष सूरजित पवार, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष महेश यादव, ‘मॅक’चे अध्यक्ष हरिश्‍चंद्र धोत्रे, प्रेस क्‍लबचे अध्यक्ष विजय पाटील, नवीन महाजन, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष ओंकार देशपांडे, सुधीर राऊत आदी व्यासपीठावर उपस्थित होते. हर्षवर्धन भुरके, मनोज गुणे, जयेश पाटील, सारिका बकरे, अजित तांबेकर, मनीषा पाटील, नरेंद्र जोशी यांनी संयोजन केले.

बुलेट ट्रेनचा ब्रेक..!
ताशी ३३० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी लागणारे ब्रेक जर्मनीनंतर फक्त कोल्हापुरात आणि तेही श्री. पाटील यांच्या घाटगे-पाटील इंडस्ट्रीत तयार होतात. त्यांचा गौरव करण्याची संधी मिळते, हेच मोठे भाग्य आहे. उद्योगात येणाऱ्या नव्या पिढीने न्यूनगंड बाजूला टाकून झपाटून काम केले पाहिजे, असे या वेळी श्री. चितळे यांनी सांगितले.

Web Title: The industrial leadership of Kolhapur is the true leadership Girish Chitale