तरूण गुन्हेगारांना उद्योजक कौशल्य विकास प्रशिक्षण - सुहेल शर्मा

बलराज पवार
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सांगली - चैनीसाठी वाममार्गाने पैसा मिळवण्यासाठी चोऱ्या, लूटमार करताना पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या 16 ते 22 वयोगटातील गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना किमान कौशल्य विकास योजनेत विविध प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा पोलिस दलातर्फे राबवण्यात येणार आहे.

सांगली - चैनीसाठी वाममार्गाने पैसा मिळवण्यासाठी चोऱ्या, लूटमार करताना पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या 16 ते 22 वयोगटातील गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना किमान कौशल्य विकास योजनेत विविध प्रशिक्षण देण्याचा उपक्रम जिल्हा पोलिस दलातर्फे राबवण्यात येणार आहे. त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी
दिशा नावाचा हा उपक्रम येत्या पंधरा दिवसात सुरु करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांमध्ये 16 ते 18 या अल्पवयीन गटातील तसेच 18 ते 22 वयोगटातील तरुण गुन्हेगारीकडे वळल्याचे निदर्शनास आले आहे. किरकोळ मारामारी, चोऱ्या, खंडणी अशा प्रकारचे गुन्हे केलेले हे गुन्हेगार पोलिसांना सापडले आहेत. नवीनच गुन्हेगारीकडे वळणाऱ्या या वयोगटातील गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याचे अधीक्षक श्री. शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी याला दुजोरा दिला. मात्र त्याचवेळी ही
नवीनपिढी गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्यापुर्वी त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी किमान कौशल्य विकास कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्याची संकल्पना मांडली आहे.

याबाबत माहिती देताना अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे म्हणाले, 16 ते 22 वयोगटातील पिढीत चैनीची प्रवृत्ती वाढत असते. त्यासाठी त्यांना पैशाची गरज असते. तो मिळवण्यासाठी ते गुन्हेगारीकडे वळतात. किरकोळ चोऱ्या, खंडणी, लूटमार अशा प्रकारच्या गुन्ह्यातून ते पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा गुन्हेगारांची ही नकारात्मक ऊर्जा सकारात्मकते वळवण्यासाठी त्यांना छोट्या उद्योगांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशासकीय संस्था, सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. मोबाईल दुरुस्ती, संगणक, लॅपटॉप दुरुस्ती, फिटर, वेल्डर असे विविध सुमारे 50 अभ्यासक्रम तयार केले आहेत. पंतप्रधानांच्या किमान कौशल्य विकास
कार्यक्रमांतर्गत हे अभ्यासक्रम मोफत शिकवण्यात येणार आहेत. तसेच या तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज सुविधा देण्याचाही प्रयत्न करणार आहे. पोलिस आणि एनजीओ यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात येणार
आहे.

Web Title: Industrial Skills Development Training for Criminals