आटपाडीमध्ये डाळिंब बागावर रोगांच्या प्रादुर्भाव

आटपाडीमध्ये डाळिंब बागावर रोगांच्या प्रादुर्भाव

आटपाडी - टँकरच्या पाण्यावर जोपासल्या डाळिंब बागावर वादळाचा पाऊस आणि त्यानंतर थंडीऐवजी पडलेल्या कडक उन्हामुळे तेल्या आणि ओला करपा रोगाने घाला घातला आहे. या रोगापासून विविध महागड्या औषधांची फवारणी घेऊन बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालली आहे. तेल्या आणि ओला करपा रोगाने मोठे क्षेत्र बाधित झाले आहे. त्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई दयावी, अशी मागणी आहे.  

आटपाडी तालुक्यात जवळपास आठ ते दहा हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केलेली आहे. यातून दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. यावर्षी मात्र दरवर्षीच्या तुलनेत 30 ते 40 टक्के उत्पादन तरी निघेल का याची शंका आहे. अगोदरच पाऊस नसल्यामुळे आनेक  धरलेल्या बागा सोडून दिल्या. तर उरलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या जिकिरीने पाणी उपलब्ध करून आणि टँकरच्या पाण्यावर बागाचा हंगाम जोपासला होता. बागाचा हंगाम धरून तीन ते चार महिने झाले आहेत. विक्रीसाठी अद्याप दोन ते तीन महिने बाकी आहेत. गेल्या आठवड्यात गज वादळाने तालुक्यात चांगली हजेरी लावली. या पावसाचे शेतकरी आणि डाळिंब उत्पादकांनी स्वागत केले. पावसाचा चांगला उपयोग होईल असे वाटत होते मात्र पाऊस थांबल्यानंतर थंडी पडण्याऐवजी कडक ऊन पडले. त्याचा परिणाम तेल्या आणी ओला करपा रोग बागेत पसरण्यावर झाला. बागा धरल्यापासून अत्यंत तोडके पाणी मिळाले होते. त्यात पावसाचे जास्त पाणी मिळाल्यामुळे डाळिंब बागात ओला करपा रोग शिरला आहे. तेल्या आणि करपा रोग झपाट्याने पाय पसरू लागला आहे. या दोन्ही रोगापासून जवळपास 30 टक्के शेत्र बाधित झाले आहे. या दोन्ही रोगापासून बागा वाचवण्यासाठी शेतकरी अत्यंत महागड्या औषधांची फवारणी करीत आहेत. यंदाचे वर्ष डाळिंब उत्पादकांच्या दृष्टीने अत्यंत खराब जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माझ्या बागेला चार महिने झालेत. टॅकरने पाणी घालून बाग जोपासली पण परवाच्या पावसानंतर तेल्या आणि करपा रोग बागेत शिरला. मोठे नुकसान केले आहे.
- सर्जेराव खिलारे (कृषीभूषण शेतकरी करगणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com