"लम्पी स्कीन'चा जत तालुक्‍यातील 11 गावांत शिरकाव; "पशुसंवर्धन' निद्रिस्त, पशुधन धोक्‍यात

जयसिंग कुंभार
Wednesday, 30 September 2020

जत (जि .  सांगली) तालुक्‍यातील 11 गावांत जनावरांतील लम्पी स्कीन डिसीजचा (एलएसडी) प्रादुर्भाव झाला आहे. हा रोग नवीन असल्याने शेतक-यांना माहिती नाही. दुभती जनावरे संकटात आहेत.

उमदी : जत (जि .  सांगली) तालुक्‍यातील 11 गावांत जनावरांतील लम्पी स्कीन डिसीजचा (एलएसडी) प्रादुर्भाव झाला आहे. हा रोग नवीन असल्याने शेतक-यांना माहिती नाही. दुभती जनावरे संकटात आहेत. रोग संसर्गजन्य असल्याने वेगाने फैलावणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडे संख्याबळ कमी असल्याने दुर्लक्ष होत आहे. पशुधन संकटात सापडलेय.

खिलार जनावरांसाठी व माडग्याळ जातीच्या मेंढ्यासाठी तालुका प्रसिद्ध आहे. भूमीहीन शेतमजूर, ऊसतोड मजूर शेळी पालन करतो. शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. 

तालुक्‍यातील जनावरांची संख्या 5 लाख 59 हजार 101 इतकी झाली. गायी 88 हजार 22, म्हैशी 62 हजार 200, शेळ्या 1 लाख 1 हजार 430, मेंढ्या 56 हजार 259, कोंबड्या 2 लाख 51 हजार 190 इतकी संख्या आहे. 

अचकनहळ्ळी, डफळापूर, बनाळी, आवंढी, शेगाव, रामपूर, करजगी, बोर्गी, बालगाव, हळ्ळी, उमदी या गावांत पशुधनात लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रारंभीची लक्षणे दिसत आहेत. 

उमदीतील शेतक-यांच्या बैलाच्या अंगावर गाठी उठल्या आहेत. पाय सुजले आहेत. बेंबीच्या खाली गाठी आल्या आहेत. ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे अशी लक्षणे दिसत आहेत. 

हा आजार विषाणूजन्य आहे. कॅप्रीपोक्‍स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने गाय, बैल, वासरांना होणारा रोग आहे. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार कीटक, डास, चावणा-या माश्‍या, गोचिड आदींमार्फत होतो. आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो. उष्ण व आर्द्रता हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. 

रोगाची बाधा गाय व म्हैस वर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांत रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण 10 ते 20 टक्के जनावरांत होतो. आजारामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त बनत आहेत. 

भूक मंदावण्याची सुरवातीची लक्षणे आहेत. नंतर दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते. काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. या रोगात जनावरांची त्वचा खराब झाल्याने जनावर विकृत दिसते. आजार बाधित जनावर गावापासून दहा किलोमीटर बंदीस्त जागेत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 

लक्षणे आढळल्यास संपर्क साधा

जत तालुक्‍यात लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव झाल्यानंतर गोट फॅक्‍स औषधाचे 16 हजार डोस उपलब्ध झालेत. आजपासून बाधित गावात लसीकरण सुरू केले आहे. गोचीडचे औषधे, लस मागवली आहे. आजारी पशुधन निरोगी जनावरापासून वेगळे बांधावे. पशुधनात तशी लक्षणे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय अधिका-याशी संपर्क साधावा.

- डॉ. व्ही. बी. जवणे, तालुका पशुसंवर्धन विस्तार अधिकारी 

प्रभावी उपाय योजनां करा

रोग नवीन असल्याने लवकर समजत नाही. ताप, डोळे, नाकातून स्त्राव येणे, चारा कमी खाणे, भूक मंदावणे आदी लक्षणे आहेत. रोग वेगाने पसरणार असल्याने पशुसंवर्धन विभागाकडून प्रभावी उपाय योजनां करावी.
- मलप्पा बगले, शेतकरी, उमदी

संपादन : युवराज यादव  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infestation of "Lampi Skin" in 11 villages of the Jat taluka