
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे शहरासह तालुक्यात सखल भागात अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे.
शेवगाव : जागोजागी साचलेल्या डबक्यांमुळे व उघड्यावरून वाहणाऱ्या गटारांमुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. शहरातील नागरिक डासांच्या वाढत्या त्रासामुळे हैराण झाले आहेत. त्यातून उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या आजारांनीही त्रस्त झाले आहेत.
डासांचा उपद्रव वाढला
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे शहरासह तालुक्यात सखल भागात अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. ओढे - नालेही तुडुंब भरलेले आहेत. पाणी जिरण्यास व वाहून जाण्यास वाव नसल्याने, अनेक दिवस साचून त्याची दुर्गंधी येऊ लागली आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे.
दवाखाने हाऊसफुल्ल
डासांमुळे थंडी-ताप, चिकुनगुन्या, डेंगी यांसारख्या आजारांना नागरिक व विशेषत: लहान मुले बळी पडत आहेत. उपचारासाठी खासगी व सरकारी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी होत आहे. शेवगावसह परिसरातील खासगी डॉक्टरांकडून नागरिकांची पिळवणूक होत आहे. सरकारी दवाखान्यात व्यवस्थित सुविधा व औषधोपचार मिळत नसल्याने, नाइलाजाने नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो. त्यातच ऋतूबदलामुळे सर्दी, खोकला व त्यातून होणारे संसर्गजन्य आजारही वाढले आहेत. त्याचा परिणाम लहान मुले व वृद्धांवर जाणवत आहे.
धूरफवारणीची गरज
एकीकडे नागरिक विविध आजारांनी त्रस्त असताना पंचायत समिती व नगरपरिषदेचा आरोग्य विभाग याबाबत कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही. शिवाय, नियमित धूरफवारणी करून प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचा फैलाव होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता आहे.
तत्काळ वैद्यकीय उपचार घ्या
सध्या हवामानबदलामुळे विविध आजारांची लागण झालेले रुग्ण वाढत असले, तरी त्यामध्ये डासांच्या प्रादुर्भावामुळे होणारे आजार अधिक आहेत. किरकोळ थंडी-तापाची लक्षणे दिसू लागल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार करून घ्यावेत. आराम करावा, भरपूर पाणी प्यावे, परिसर स्वच्छ ठेवून डबकी व उघड्या गटारांत डासांची उत्पत्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
- डॉ. सुशील पायघन, शेवगाव