बेलापूर परिसरातील खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

बेलापूर परिसरातील खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

श्रीरामपूर- अपुऱ्या पावसाअभावी बेलापूर परिसरातील खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. उसाला हुमणी व लोकरी माव्याने ग्रासले असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अशा वेळी कृषी विभाग व कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी केली. जुलैमध्ये थोडाफार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली. ढगाळ वातावरण आणि अपुरा पाऊस यामुळे किडी व रोगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. सोयाबीनवर शेंडेअळी, तुडतुडे यांचा, तर कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटकनाशक फवारणीवर मोठा खर्च करूनही किडींचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

शेतकऱ्यांच्या सर्व आशा उसावर लागलेल्या असतानाच, आता या पिकाला हुमणी किडीचा विळखा पडला आहे. हुमणी अळी जमिनीखाली वाढत असल्याने त्यास आटोक्‍यात आणणे जिकिरीचे आहे. अनेक ठिकाणी या किडीने उसाचे पीक फस्त केले आहे. काही भागात खोडकिडा, तसेच लोकरी मावा पडल्याचेही दिसते. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व दिलासा मिळण्याची गरज आहे. तथापि, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व संबंधित यंत्रणेकडून कुठलेही मार्गदर्शन मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. 

बोंडअळी व हुमणी किडीसंदर्भात श्रीरामपूरसह गळनिंब, बेलापूर येथे प्रशिक्षण शिबिरे घेतली असून, टाकळीभानला शिबिर घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहोत. कृषी विभागाकडून किडीवरील औषधे दिली जात नाहीत. त्यावर काय उपाययोजना करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा. 
- सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, श्रीरामपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com