पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी बिनदप्तराची शाळा! 

पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी बिनदप्तराची शाळा! 

कऱ्हाड - गरज नसतानाही विद्यार्थ्यांच्या दप्तरातून शाळेला दररोज नेण्यात येणारी पुस्तके, वह्यांमुळे दप्तराचे ओझे कमी कसे करायचे, हा बहुतांश शाळांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या येथील सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील उपशिक्षक अमोल कोळेकर यांनी नावीन्यपूर्ण मार्ग काढला असून, चक्क ‘बिनदप्तराची शाळा’ ही अभिनव संकल्पना राबवली आहे. 

केंद्र शासनाने मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत नुकताच आदेश दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतून दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत कितीही सांगितले तरी त्यांच्या दप्तरात दररोज अनावश्‍यक पुस्तके, वह्या भरलेल्या आढळतात. पटसंख्या कमी असलेल्या शाळांमध्ये दप्तराच्या ओझ्यावर नियंत्रण ठेवणे शक्‍य असले तरी मोठ्या पटसंख्या असलेल्या शाळांत मुलांच्या दप्तरांची दररोज तपासणी करणे सोपे नाही. याचा विचार करून सद्‌गुरू गाडगे महाराज प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक श्री. कोळेकर यांनी अभिनव संकल्पना राबवली.

श्री. कोळेकर यांच्याकडे चौथीचा वर्ग असून तो डिजिटल आहे. या वर्गात रयत शिक्षण संस्थेने शताब्दी वर्षानिमित्त शाळेला दिलेला इंटरॲक्‍टिव्ह बोर्ड बसवण्यात आला आहे. खडू व बोलण्याला फाटा देताना खडूशिवाय लिहिता येणारा टच स्क्रीन बोर्ड आहे. या बोर्डच्या वापराबाबत रयततर्फे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळेने या वर्गात इंटरनेट सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तंत्रस्नेही शिक्षक श्री. कोळेकर यांनी या वर्गात चौथीच्या सर्व विषयांची पाठ्यपुस्तके डाउनलोड करून घेतली आहेत. शिवाय इंटरनेटच्या माध्यमातून अध्यापनात शैक्षणिक व्हिडिओज, धडे, कविता एकाचवेळी इंटरॲक्‍टिव्ह बोर्डवर उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कोणत्याही विषयाची पाठ्यपुस्तके आणण्याची आवश्‍यकताच राहिली नाही.

विद्यार्थ्यांना मिळालेली मोफत पाठ्यपुस्तके मुलांना घरीच अभ्यासासाठी ठेवण्यास सांगितले आहे. पाठ्यपुस्तके नसल्याने विद्यार्थ्यांना दप्तरदेखील आणण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे पाठीवर दप्तर नसल्याने आपोआपच त्यामध्ये नको त्या वह्या, पुस्तकांचा भरणा राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी दररोज केवळ डब्याच्या पिशवीमध्ये  सर्व विषयांसाठी एकच वही, पेन व जेवणाचा डबा इतकेच साहित्य सोबत आणतात.

शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असल्याने पिशवीत रिकामी बाटली आणली जाते. त्यामुळे दप्तराचे वजन एक किलोपेक्षा कितीतरी कमीच असते. शिवाय स्वाध्याय वह्याऐवजी संगणकावर स्वतः तयार केलेल्या वर्कशीट घेण्यात येत असल्याने स्वाध्याय वह्यांचे अतिरिक्त ओझे पूर्णत: कमी झाले आहे. आपल्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह आहे. विद्यार्थी डिजिटल पद्धतीने आनंददायी शिक्षण घेत आहेत. पाठ्यपुस्तकातील धडे जसेच्या तसे बोर्डवर पाहून मुलांना कौतुक वाटत आहे. या अभिनव प्रयोगामुळे पालकही समाधानी आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी थेट दप्तरच रद्द करण्याच्या संकल्पनेचे स्वागत होत आहे. श्री. कोळेकर यांनी राबविलेला हा उपक्रम अन्य शाळांसाठी अनुकरणीय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com