पन्नास हजारपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या खातेदारांची चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

कोल्हापूर - नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेत 50 हजारपेक्षा जास्त रक्कम भरलेल्या सर्वच खातेदारांची नाबार्डकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. नाबार्डकडून बॅंकेची ही तिसऱ्यांदा तपासणी होत आहे. यावेळी प्रत्येक खातेदाराची "केवायसी' तपासली जाणार आहे. 

कोल्हापूर - नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेत 50 हजारपेक्षा जास्त रक्कम भरलेल्या सर्वच खातेदारांची नाबार्डकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. नाबार्डकडून बॅंकेची ही तिसऱ्यांदा तपासणी होत आहे. यावेळी प्रत्येक खातेदाराची "केवायसी' तपासली जाणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी चलनातून 500 व 1000 च्या नोटा रद्द ठरवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे तीन दिवस या नोटा स्वीकारण्यास देशभरातील जिल्हा बॅंकांना परवानगी दिली होती. या काळात जिल्हा बॅंकांत राष्ट्रीयीकृत बॅंकांपेक्षा जादा रक्कम जमा झाली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत या काळात सुमारे 249 कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटा जमा झाल्या. त्यानंतर जिल्हा बॅंकांना नोटाबंदी करण्यात आली. 

नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटा चेस्ट करन्सी बॅंकांनी स्वीकारल्या नव्हत्या. या नोटा स्वीकाराव्यात व बॅंकांना पुरेसा चलनपुरवठा व्हावा, या मागणीसाठी बॅंकांतर्फे न्यायालयात धाव घेण्यात आली. न्यायालयाने "केवायसी'ची पूर्तता झालेल्या खात्यावरील नोटा स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेला दिले. या "केवायसी'ची तपासणी करण्याचे आदेश नाबार्डला देण्यात आले होते. 

गुरुवारपासून प्रक्रिया 
नाबार्डने यापूर्वी दोनवेळा जिल्हा बॅंकेच्या काही शाखा व काही ठराविक खात्यांची चौकशी करून "केवायसी'ची खात्री केली होती. तसा अहवालही नाबार्डला सादर केला होता. पण रिझर्व्ह बॅंकेने नाबार्डला नोटाबंदीच्या काळात ज्या खात्यावर 50 हजारपेक्षा जास्त रक्कम भरलेल्या सर्वच खात्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार गुरुवारपासून (ता. 6) ही तपासणी जिल्हा बॅंकेत होणार आहे. या तपासणीचा अहवाल सादर झाल्यानंतर जुन्या नोटा स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. 

Web Title: Inquiry account holder Deposit More than fifty thousand