इथल्या हॉटेल, लॉजेसना प्रशासनाचा दणका...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर "सकाळ'ने शहरातील हॉटेलचे स्टींग ऑपरेशन केल्यानंतर आज महापालिका आरोग्य विभागाने तातडीने सांगली, मिरजेतील हॉटेल, लॉजेसची तपासणी केली.

सांगली : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर "सकाळ'ने शहरातील हॉटेलचे स्टींग ऑपरेशन केल्यानंतर आज महापालिका आरोग्य विभागाने तातडीने सांगली, मिरजेतील हॉटेल, लॉजेसची तपासणी केली. काही ठिकाणी हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळून आली तर काही ठिकाणी हात धुण्यासाठी साबण, हॅण्डवॉश नसल्याचे दिसून आले. या सर्वांना सूचना देण्यात आल्या असून अस्वछता दिसल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.

आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह पथकांनी अचानक तपासणी केली. "सकाळ'ने सांगली, मिरजेतील हॉटेलची स्वच्छतेबाबत स्टींग ऑपरेशन मंगळवारी केले होते. याचे वृत्त आज प्रसिध्द होताच महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शहरातील हॉटेलमध्ये स्वच्छतेबाबत तपासणीचे आदेश दिले. आयुक्त कापडणीस, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनीही हॉटेल, लॉजची तपासणी केली. स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, वैभव कुदळे यांच्या पथकाने शहरातील बसस्थानक परिसरात असणाऱ्या हॉटेलची केली. 

आज दिवसभर महापालिकेच्या पथकाने सांगली, मिरजेतील हॉटेल आणि लॉज तपासले. हॉटेलमधील स्वच्छता, हात धुण्यासाठी हॅण्डवॉश, साबणची सोय, खाण्यापिण्याचे पदार्थ तसेच भाज्यांची स्वच्छता याबाबत काळजी घेतली जाते का? तेही तपासले. ही मोहीम तिन्ही शहरात सातत्याने सुरू राहणार असून ज्या हॉटेलमध्ये अनियमितता अस्वच्छता दिसेल तिथे कारवाई केली जाणार आहे. 

याबाबत आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्व उपाय केले जात आहेत. हॉटेल, लॉजेस यांना स्वच्छतेबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. 
तपासणीमध्ये काही हॉटेलमध्ये अस्वच्छता तसेच हात धुण्यासाठीही साबण वगैरे नसल्याचे दिसून आले. त्यांना या सुविधा उपलब्ध करण्याची ताकीद देण्यात आली आहे. तसेच हॉटेलमध्ये अनावश्‍यक ग्राहकांना बसू देऊ नये, गर्दी करु नये याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. अस्वच्छता आढळल्यास संबंधित आस्थापना सील करुन सहा महिने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

डॉ. रविंद्र ताटे म्हणाले, लॉजचीही तपासणी करण्यात आली. तेथे बाहेरुन कुणी नागरिक आलेत का? याची चौकशी केली. परदेशी नागरिक आलेले नाहीत. मात्र व्यवसायाच्या निमित्ताने दिल्ली, ठाणे, मुंबई आदी भागातून काहीजण आलेत. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. 
या तपासणीमध्ये पाणीपुरीवाल्यांचीही तपासणी केली. 

हॉटेलला 50 हजाराचा दंड 
सांगली शहरात रस्त्यावर बांधकामाचा राडारोडा टाकल्याबद्दल मध्यवर्ती बस स्थानकासमोरील हॉटेल लक्ष्मीच्या चालकाला महापालिकेच्या पथकाने 50 हजाराचा दंड केला. त्यांच्याकडून दंडाच्या रकमेचा धनादेशही वसूल केला आहे. याचबरोबर रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

एसटीला पाच हजाराचा दंड 
कोल्हापूर रोडवरील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या आवारातील कचरा जाळल्याबद्दल एसटी विभागावर महापालिकेने पाच हजाराची दंडात्मक कारवाई केली आहे. स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने यांनी ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspection of Sangli, Mirage Hotel, Lodges